व्हॅलेंटाईन डे ची उलाढाल १८ हजार कोटींवर जाणार

valentine'sday

मुंबई – जगभरात प्रेमदिवस म्हणून साजर्‍या होत असलेल्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारी उलाढाल यंदाच्या वर्षी १८ हजार कोटींच्या घरात जाईल असा अंदाज असोचेमने व्यक्त केला आहे. भारतात या सणाची लोकप्रियता वाढतच चालली आहे आणि येथे हा सण आठवडाभर साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्या प्रियतमांना अनेक प्रकारच्या भेटवस्तू दिल्या जातात. त्यात फुले, चॉकलेटस, खेळणी, विविध प्रकारची इलेक्ट्रोनिक उपकरणे यांचा समावेश असतो.

असोचेमने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की गतवर्षीपेक्षा यंदा या सणासाठी होणारी खरेदी २५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी १५ हजार कोटींची उलाढाल झाली होती ती यंदा १८ हजारांवर जाईल असे दिसून येत आहे. या सर्वेक्षणसाठी असोचेमने अशा भेटवस्तू बनविणार्‍या ५०० कंपन्यांकडून माहिती गोळा केली असून त्यात ऑनलाईन शॉपिंगचाही समावेश आहे. या कंपन्यांनी तरूणवर्गाला आकर्षित करतील अशा अनेक योजना जाहीर केल्या आहेत. इतकेच नव्हे तर हॉटेल्स, रेस्टॉरंटस यांनीही खास योजना जाहीर केल्या आहेत.

या सणानिमित्ताने स्पा आणि ब्यूटीपार्लर्समधील गर्दीतही वाढ अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. भेट वस्तू खरेदी करणार्‍यात पुरूषांचे प्रमाण ६५ टक्के तर महिलांचे प्रमाण ३५ टक्के असल्याचे असोचेमच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment