राज ठाकरेंची सुटका

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पोलिसांनी सुटका केली आहे. अटक वगळता अन्य कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी राज यांची सुटका केली. पोलिस स्टेशनमध्ये असताना, राज यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर दूरध्वनीवरुन चर्चा झाली. उद्या सकाळी दहा वाजता सहयाद्री अतिथीगृहावर राज आपल्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना रास्ता रोको आंदोलन थांबवण्याच्या सूचना केल्या असून, कुठेही हिसंचार होणार नाही याची खबरदारी घ्या असा सल्ला दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाल्यानंतर काही भागात आंदोलन हिंसक बनले होते.

कांदिवली चारकोप, डोंबिवली आणि नाशिकच्या घंटाळी भागात दुकाने बंद करण्यात आली होती. ठाण्यात पाचपाखाडी येथे हातगाडी जाळण्यात आली. ठाण्यात टिपटॉप प्लाझा येथे दगडफेक करण्यात आली. औरंगाबादमध्येही काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या असून, वाशी टोलनाक्यावर आंदोलन करणा-या मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. वाशी टोल नाक्यावर रास्ता रोकोचे नेतृत्व करायला निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पोलिसांनी चेंबूर येथे अडवून अटक केली. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना अटक करण्यात आली असून, आंदोलन शांत झाल्यानंतर त्यांना सोडून देऊ असे पोलिसांनी सांगितले होते.

राज यांच्यासोबत असणारे मनसे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनाही अटक झाली होती. सकाळी दहाच्या सुमारास कृष्णकुंजवरुन निघालेल्या राज यांच्या ताफ्याला पोलिसांनी चेंबूर येथे अडवले होते. पोलिस राज यांच्या ताफ्यातील गाड़या पुढे सो़डायला तयार नव्हते. राज यांच्यासोबत असणारे मनसे आमदार नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याने गाडया पुढे सोडाव्यात अशी मागणी करत होते. मात्र राज वाशी टोलनाक्यावर पोहोचल्यास कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे गाडया पुढे सोडणार नाही अशी पोलिसांची भूमिका होती. मात्र राज वाशी टोल नाक्यावर जाण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी त्यांना अखेर अटक केली. राज यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी चेंबूर येथेच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Leave a Comment