मधुमेहींना वरदान : एका मिनिटात चाचणी

भारत सरकारच्या आरोग्य खात्याने गेल्या काही दिवसांपासून रक्ताची चाचणी अर्थात रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजण्याची चाचणी स्वस्त कशी होईल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते. या खात्याने ही चाचणी पाच रुपयांत कशी होईल या करिता शास्त्रज्ञांनी संशोधन करावे, असे आवाहन केले होते. परंतु आजपर्यंत तरी ते स्वप्नच राहिले होते. सरकारला ही चाचणी स्वस्त हवी होती, कारण भारतामध्ये मधुमेहींची संख्या वाढत चालली आहे. सध्या आपल्या देशात ६ कोटी १० लाख मधुमेही आहेत आणि ही संख्या झपाट्याने वाढत जाणार असे संकेत आहेत. म्हणून सरकारची मोठ्या प्रमाणावर लोकांची रक्तचाचणी घेण्याची योजना होती. सरकारला २१ राज्यातल्या १०० जिल्ह्यांमध्ये वृद्ध व्यक्ती तसेच गरोदर महिला यातील पाच कोटी लोकांची अशी चाचणी घेण्याची योजना राबवायची होती. ही चाचणी पाच रुपयात झाली असती तर ही सरकारला ही योजना राबवणे अवाक्यातले झाले असते. पण आजपर्यंत ते शक्य झाले नाही.

आता मात्र पिलानी येथील आय.आय.टी.च्या काही संशोधकांनी क्रांतीकारक संशोधन केले आहे. रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजण्याची चाचणी पाच नव्हे तर केवळ दोन रुपयात आणि तीही एका मिनिटात होईल, असे तंत्र त्यांनी शोधून काढले आहे. या तंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे ही चाचणी कोणीही आपल्या घरी करू शकतो. त्यासाठी कोणत्या तज्ज्ञाची गरज नाही. एक साधे ग्लुकोमीटर विकत घेतले आणि ते घरात ठेवले की घरातल्या प्रत्येकाची रक्त शर्करेची चाचणी सहजपणे घेता येईल. घरात लहान मूल आजारी असले की, त्याला किती ताप असेल याचा अंदाज आपल्याला येत नाही. पण आपण थर्मामीटरच्या साह्याने त्याचा ताप मोजू शकतो. ते थर्मामीटर सुद्धा ङ्गार स्वस्त असते आणि त्यावर ताप मोजण्यासाठी मोठ्या वैद्यकीय तज्ज्ञाची गरज भासत नाही. त्याच थर्मामीटरच्या धर्तीवरील ग्लुकोमीटर घरात ठेवले की, ताप पहावे इतक्या सहजतेने रक्तातील साखरेचे प्रमाण मोजता येईल, असे हे संशोधन आहे.

मात्र ताप आणि रक्ताची चाचणी यात एक ङ्गरक जरूर आहे तो म्हणजे रक्ताची चाचणी करण्यासाठी शरीरातले रक्त काढून घ्यावे लागते. आपण रक्त तपासणीसाठी पॅथॉलॉजिस्टकडे गेलो की, तो साधारण ३ मिली लीटर रक्त काढून घेतो. परंतु या प्रस्तावित क्रांतीकारक ग्लुकोमीटरच्या साह्याने रक्त तपासणीसाठी रक्ताच्या एखाद्या थेंबाची सुद्धा गरज नाही. एका थेंबाच्या एक दशांश एवढे अल्प रक्त त्याला पुरते. पिलानीच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑङ्ग टेक्नॉलॉजी या संस्थेतील संशोधक सुमन कपूर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी हे ग्लुकोमीटर शोधून काढले आहे. अशा प्रकारचे संशोधन केल्यास त्याला इंडियन कौन्सिल ऑङ्ग मेडिकल रिसर्च या संस्थेची मान्यता आवश्यक असते आणि हे ग्लुकोमीटर या संस्थेच्या परीक्षणातून पास झाले आहे. आता या ग्लुकोमीटरच्या प्रत्यक्ष उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक असलेली पावले टाकणे बाकी आहे. त्यात पहिल्यांदा या संशोधकांच्या नावाने या ग्लुकोमीटरचे पेटंट नोंदवावे लागेल.

ते नोंदवणे झाले की त्याचे प्रोटोटाईप तयार केले जाईल आणि मग औद्योगिक तत्वावर त्याचे उत्पादन करण्यासाठी हे प्रोटोटाईप किंवा त्याचे तंत्रज्ञान कोणा तरी एका उद्योग संस्थेला दिले जाईल. साधारणत: या प्रक्रिया दोन वर्षात पूर्ण होतील आणि हे ग्लुकोमीटर बाजारात उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. भारतामध्ये मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. परंतु मधुमेहाची चाचणी सोपी नाही आणि स्वस्तही नाही. त्यामुळे लोकांची चाचणी मोठ्या प्रमाणावर होत नाही आणि त्यामुळे मधुमेहाचा हा विळखा नेमका किती गंभीर स्वरूपाचा आहे याचा अंदाज कधीच येत नाही. सध्या भारतामध्ये ६ कोटी १० लाख मधुमेही असल्याचा अंदाज आहे. २०३० सालपर्यंत ही संख्या १० कोटीवर जाईल, असा अंदाज आहे. सध्या आपल्या देशात दरसाल ९८ लाख लोकांचे मृत्यू मधुमेह आणि त्यातून उद्भवणार्‍या गुंतागुंतींमुळे होतात. हे प्रमाण कमी करण्यास ही स्वस्त आणि मस्त चाचणी उपयुक्त ठरणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment