बडवे-उत्पातांची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव

पंढरपूर – पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठलाचे पुजारी बडवे आणि रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात यांनी गेल्या महिन्यातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्यांच्या विरोधातल्या निकालाच्या संदर्भात याच न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बडव्यांची याचिका दाखलही झाली आहे. उत्पातांची याचिका एक-दोन दिवसात दाखल होईल असे उत्पात मंडळींचे प्रवक्ते भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी सांगितले.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा करण्याचा आपला अधिकार शाबूत रहावा यासाठी बडवे आणि उत्पात यांनी प्रदीर्घ काळ न्यायालयीन लढा दिलेला आहे. पण गेल्या महिन्यात त्यांना या लढ्यात अंतिम अपयश आले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय दिला. त्यामुळे आता या मंदिरात बडव्यांच्या हातून पूजा होणार नाही आणि त्यांचे हे उत्पन्नाचे साधनही हिरावले गेले आहे.

सर्वोच्च न्यायालयानेच निकाल दिल्यामुळे बडवे-उत्पात यांचा निरुपाय झाला होता. मात्र त्यांच्यासमोर त्याच न्यायालयात फेरविचाराची याचिका दाखल करण्याचा एक मार्ग शिल्लक राहिला होता तो चोखाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हा फेरविचार अर्ज दाखल करून घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जुन्या निकालाला स्थगिती दिली तर या पुजार्‍यांना दिलासा मिळणार आहे, कारण त्यामुळे पुन्हा त्यांच्या पूजेचे हक्क त्यांना मिळणार असून फेरविचार याचिकेचा निकाल लागेपर्यंत ते त्यांच्याकडे राहणार आहेत.

Leave a Comment