टोल धोरण बदलण्याची मुख्यमंत्री चव्हाण यांची तयारी

मुंबई- महाराष्ट्रातील टोल प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी रस्त्यांबाबतची दाहकता यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांना दाखवून दिली. त्यानंतर टोल धोरणात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. त्या‍मुळे मनसेच्या आंदोलनाला काही अंशी यश मिळाले असे मानले जात आहे.

यावेळी झालेल्या बैठकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील १० कोटींपेक्षा कमी खर्च आलेल्या रस्त्यांना टोल का आकारला जातो असा सवाल करून अशा रस्त्यांची एक यादीच मुख्यमंत्र्यांकडे सोपवली. तसेच अपूर्ण रस्ते आणि त्यांचे वास्तव दर्शवणारे फोटोही मुख्यमंत्री चव्हाण यांना दाखवले.

सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी सकाळी राज ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या पक्षाचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि काही मोजक्या पत्रकारांचे शिष्टमंडळही चर्चेसाठी गेले होते. तसेच या बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. टोलविरोधी आंदोलन करत राज ठाकरे यांनी बुधवारी रास्तारोकोचे आवाहन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी ते स्वत: वाशीच्या दिशेने निघाले असता पोलिसांनी त्यांना सायन-चुनाभट्टीच्या दरम्यान ताब्यात घेतेले. त्यानंतर दीड तासाने सोडून दिले. तोपर्यंत आंदोलनातील सर्व हवाच गेली. मात्र आपले मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. आपल्याला चर्चेसाठी बोलावल्याचे सांगत राज यांनी हे टोलविरोधी आंदोलन स्थगित केले. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी राज यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली.

Leave a Comment