कर्नाटकाची विजयी मोहीम सुरुच

बेंगलोर- घरच्या मैदानावर खेळत असलेल्या व भन्नाट फॉर्मात असलेल्या आर. विनय कुमारच्या कर्नाटक संघाने रणजीपाठोपाठ इराणी चषकही जिंकला आहे. शेष भारताविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच डावात ६०६ धावांचा डोंगर उभारल्यावर कर्नाटक हा सामना जिंकणार हे जवळपास स्पष्ट झाले आणि बुधवारी त्यांनी शेष भारताचा दुसरा डाव १८३ धावांवर गुंडाळत एक डाव आणि २२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्याात भेदक मारा करताना लेग-स्पिनर श्रेयस गोपालने हॅट्ट्रिकसह डावात पाच बळी मिळवीत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

या सामन्यात कर्णधार आर. विनय कुमारने दमदार कामगिरी करीत सामन्यात १० बळी मिळवले. त्यामुळे विनयकुमारला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी ३ बाद ११४ धावांवरून सुरुवात करताना दिनेश कार्तिकच्या (२७) रूपात शेष भारतीय संघाला पहिला धक्का बसला. विनय कुमारने कार्तिकचा त्रिफळा भेदला आणि त्यानंतर शेष भारताचा डाव गडगडायला सुरुवात झाली.

सामन्याच्या ५८ व्या षटकामध्ये तिस-या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर बळी मिळवत गोपाळने हॅट्ट्रिक साजरी करतानाच संघाच्या विजयावरही शिक्कामोर्तब केला. या सामन्‍यात शेष भारतीय संघाकडून बाबा अपराजितने (६६) एकाकी झुंज दिली, पण ती व्यर्थच ठरली. यापूर्वीच कर्नाटकाने रणजी चषक जिंकताना महाराष्ट्राला पराभूत केले होते.

Leave a Comment