चीनचे चांद्रयान जेड रॅबिट निकामी

बिजिग – चीनने चंद्रावर धाडलेला यूटू म्हणजेच जेड रॅबिट हा रोव्हर पूर्णपणे निकामी झाला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे चीनच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेला मोठाच सेटबॅक बसला असल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेमुळे चंद्रावर अंतराळयान उतरविणार्‍या देशांमध्ये यु.एस, रशिया नंतर चीन तिसर्‍या क्रमांकाचा देश बनला होता.

चीनी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्येच हे यान चंद्रावर उतरले होते आणि चंद्राच्या पृष्ठभागाची निरीक्षणे ते करणार होते. मात्र तेथे यानात कांही तांत्रिक दोष निर्माण झाला. हा दोष चीनी वैज्ञानिक दुरूस्त करू शकले नाहीत.चंद्रावरच्या सततच्या बदलत्या वातावरणामुळे हा दोष निर्माण झाल्याचे सांगितले गेले होते. अखेर हे यान मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. आता हे यान पृथ्वीवर परतू शकणार नाही.

चांद्ररात्रीमुळे या यानात तांत्रिक दोष झाल्याचे तज्ञांचे मत आहे. चंद्रावरची रात्र पृथ्वीच्या १४ दिवसांइतकी असते. या काळात चंद्रावरचे तापमान उणे १८० डिग्रीपर्यंत खाली गेले होते आणि या काळात सूर्यप्रकाश नसल्याने यानावरच्या सौर बॅटर्‍या चार्ज होऊ शकल्या नाहीत व परिणामी यानात दुरूस्ती पलिकडचा बिघाड झाला असे जाहीर करण्यात आले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे तीन दशकांतले हे पहिले यान होते.

Leave a Comment