मुंबई- आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी जास्तीलत जास्तो तरूण मतदारांनी मतदानाची नोंदणी करावी यासाठी जनजागती अभियान सुरू केले होते. मोठया संख्येने नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे सांगितले जात असले तरी राज्यातील तरुणांनी मतदार होण्याबाबत कमालीचा निरुत्साह दाखविला आहे. मतदार याद्या पुनरीक्षण मोहिमेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार तब्बल ४५ लाखांहून अधिक तरुण मतदार नावनोंदणी प्रक्रियेपासून वंचीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या जनगणना आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १८ ते १९ वयोगटातील लोकसंख्या ३८ लाख ९४ हजार ५८९ असली तरी त्यापैकी अवघ्या १० लाख ७५ हजार ३७६ जणांनी मतदार यादीत नाव नोंदविले आहे. या वयोगटातील ७२ टक्के तरुण पात्र असूनही अद्याप निवडणूक प्रक्रियेपासून दूर आहेत. त्याचप्रमाणे २० ते २९ वयोगटातीलही साडेदहा टक्के तरुणांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही.
२०११ साली करण्यात आलेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार राज्यातील या वयोगटातील लोकसंख्या १ कोटी ६८ लाख २९ हजार १३ असून त्यापैकी १ कोटी ५० लाख ५५ हजार १८० तरुणांनीच मतदार यादीत नाव नोंदविले आहे. म्हणजे उर्वरित १७ लाख ७३ हजार ८३३ तरुणांनी निवडणूक प्रक्रियेकडे सपशेल पाठ फिरवली आहे. म्हणजे एकूण १८ ते २९ वयोगटातील तब्बल ४५ लाख ९३ हजार ४६ तरुण येत्या लोकसभा निवडणुकीत सहभागी होणार नाहीत. येत्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणे अपेक्षित असून त्याची घोषणा काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.