राज ठाकरेंचे टोलविरोधात आंदोलन निवडणुकीसाठी-भुजबळ

नाशिक – आगामी काळात होत असलेल्याी लोकसभेच्या निवडणूका लक्षात घेता मनसेचे अध्य‍क्ष राज ठाकरे टोलविरोधात आंदोलन करत आहेत. हे केवळ निवडणुकीसाठीचे राजकारण असल्याची टीका करत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले. भुजबळांनी राज यांना लक्ष्य करताना आंदोलन करण्यापेक्षा चर्चा करा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. तसेच टोलवसुलीबाबत मनसेतर्फे देण्यात येणारी माहिती चुकीची असून राज्यात केवळ दोन ते अडीच टक्के रस्त्यांवर टोल आकारण्यात येत आहे. राज यांनी टोल असलेल्या अनेक रस्त्यांवर टॉयलेट-बाथरूम नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर बोलताना ९८ ठिकाणी ही सुविधा असून उर्वरीत ठिकाणी ती तात्काळ कार्यान्वित होईल. काही ठिकाणचे टोलनाके केंद्र सरकारचे असून अनावश्यक टोलनाके बंद करण्यासाठी आम्हीच शिफारस केली आहे.’

टोलव्यवस्था जगभरात अस्तित्त्वात असून त्याद्वारे वेळेसह इंधनबचत होते. राज्यातील एकूण वाहनांपैकी केवळ अडीच टक्के वाहने टोल भरतात असेही त्यांनी सांगितले. मात्र मनसे केवळ आपली लोकप्रियता वाढविण्यासाठी अशाप्रकारे आंदोलन करते, असा आरोप त्यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आपली लोकप्रियता वाढविण्यासाठी मनसेतर्फे या आंदोलनाचा पर्याय वापरला जात असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.

Leave a Comment