भारताला ऑलिंपिकचे दरवाजे उघडले

नवी दिल्ली – भारतीय ऑलिंपिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या नियमांनुसार निवडणूका घेतल्याने आयओसीने भारतीय ऑलिंपिक संघटनेवरील बंदी उठवली आहे. मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने भारतीय ऑलिंपिक संघटनेवरील बंदी मागे घेत असल्याचे जाहीर केले. आयओसीच्या या निर्णयामुळे १४ महिन्यांच्या विजनवासानंतर आयओएचे ऑलिंपिकच्या पटलावर पुनरागमन झाले आहे.

रविवारी झालेल्या आयओएच्या निवडणूकांमध्ये एन.रामचंद्रन यांची आयओएच्या अध्यक्षपदी निवड झाली. आयओएच्या तीन सदस्यीय आयोगाच्या देखरेखीखाली ही निवडणूक झाली. निवडणूकीच्या रिंगणात एन.रामचंद्रन एकमेव उमेदवार असल्याने ही निवडणूक निव्वळ औपचारिकता होती. ते बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचे लहान बंधु आहेत. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले सदस्य आयओएमध्ये नको ही आयओसीची मुख्य अट होती.

गुन्हेगार, आरोपींना आयओएची निवडणूक लढण्यापासून रोखणारे आवश्यक बदल आयओएच्या संविधानात केल्यानंतर या निवडणूकीला आयओसीने मान्यता दिली. भारतीय ऑलिंपिक संघटना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या नियमांनुसार निवडणूका घेण्यास तयार नसल्याने, चौदा महिन्यांपूर्वी चार डिसेंबर २०१२ आयओसीने आयओएला निलंबित केले होते. आयओसीची कारवाई झुगारुन आयओएने ठरलेल्या वेळापत्रकानुसार निवडणूका घेतल्या. मात्र निवडून आलेल्या आयओएच्या समितीला आयओसीने मान्यता दिली नाही.

Leave a Comment