बदलत्या हवेवर लक्ष ठेवा

आपल्याला अनेक वेळा आरोग्याच्या काही समस्या काही कारण नसताना निर्माण झालेल्या दिसतात. आपल्याला मधुमेह नसतानाही खूप थकल्यासारखे वाटते. काही वेळा तेलकट, मसालेदार, आंबट काही खाल्लेले नसताना आणि जागरण वगैरे काही केलेले नसतानाही पित्त वाढते. काही वेळा भिजलेले नसताना किंवा धुळीत गेलेले नसतानाही सर्दी होते. आपल्याला खूप थकल्यासारखे का वाटत आहे, काही कारण नसताना छातीत जळजळ का होत आहे आणि सर्दी का होत आहे हे आपल्या पटकन् लक्षात येत नाही. मात्र या समस्या आपल्या आयुष्यात कधी निर्माण होत आहेत यावर बारकाईने लक्ष ठेवले असता आपले असे लक्षात येईल की, काहीही चूक झालेली नसतानाही हे त्रास होतात कारण हवेत बदल होत असतो.

हिवाळा संपतो, संक्रांत येते आणि संक्रांतीनंतर एकदम तापमान वाढायला लागते. तापमान वाढले तरी आपण हिवाळ्यासारखेच उत्साहाने काम करायचा प्रयत्न करतो, पण बदलते हवामान आपल्याला तशी परवानगी देत नसते आणि वाढत्या तापमानात थंडीच्या दिवसाएवढे कष्ट करता येत नाहीत आणि मग आपल्याला काही कारण नसताना थकल्यासारखे वाटते. दोन ऋतूंच्या संधीकाळात काही कारण नसताना असे विकार होतात म्हणून आपल्या पूवर्जांनी या काळामध्ये काही विशिष्ट आहार आणि काही विशिष्ट पथ्ये पाळायला सांगितलेले आहे. ती पथ्ये न पाळल्यामुळे आपण आजारी पडतो. ङ्गेब्रुवारी महिन्यामध्ये असा थकवा येऊ नये आणि थकवा न येता काम करण्याची क्षमता टिकून रहावी म्हणून हिवाळ्याच्या दिवसात तिळाचे पदार्थ भरपूर खावेत, गोडधोड खावे असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे.

आधुनिक शास्त्रातही ही गोष्ट मान्य झालेली आहे की साखर आणि चरबी अशी शरीरात माङ्गक प्रमाणात साठली की, हिवाळ्या नंतरच्या उन्हाळ्यात त्यांच्यातून येणार्‍या ऊर्जेच्या साह्याने आपण कार्यरत राहू शकतो. आता पावसाळा संपत आहे आणि हिवाळा सुरू होत आहे. हा सुद्धा दोन ऋतूंच्या मधला संधी काळ आहे. या काळामध्ये काही कारण नसताना सर्दी होते. या संधीकाळात र्‍हायनो व्हायरस हा व्हायरस हवेत पसरतो आणि तो सर्दीस कारणीभूत ठरतो. या व्हायरसचे वैशिष्ट्य म्हणजे या बदलत्या हवामानात त्यांची वीण वाढते आणि ते विशेष करून नाकाद्वारे शरीरात जातात. जाता जाता नाकात संसर्ग पसरवतात आणि त्यातून सर्दी, खोकला आणि बारीकसा ताप सुद्धा येतो. हा ताप फ्लूसारखा नसतो. मात्र सौम्य असतो. तेव्हा त्यापासून बचाव करण्यासाठी काही पथ्ये पाळली पाहिजेत. पावसाळा संपून थंडी सुरू होते तेव्हा ती थंडी कडाक्याची नसते. गुलाबी असते. थंडी गुलाबी तर आहे मग आताच गरम कपडे वापरायचे कशाला, असे आपण म्हणतो आणि कपाटात ठेवून दिलेले गरम कपडे बाहेर काढत नाही. ते आपण नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये वापरायचे म्हणून ठेवून दिलेले असतात. परंतु हे कपडे गुलाबी थंडीत सुद्धा वापरावेत. या संधीकाळात ङ्ग्रीजचे पाणी बंद करावे. गवती चहा प्यावा. टोमॅटो ज्यूससारखे गरम ज्यूस प्यावेत. त्यातून आपण या संधीकाळातल्या आजारापासून स्वत:चा बचाव करून घेऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment