अफगाण सरकार ६५ तालिबान्यांची सुटका करणार

काबूल – अमेरिकेने दिलेल्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करून अफगाण सरकारने बगराम तुरूंगात असलेल्या ६५ धोकादायक तालिबान्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. या तालिबान्यांकडून अफगाणी तसेच नाटो फौजांना धोका असल्याने त्यांची सुटका केली जाऊ नये असे अमेरिकेने अफगाण सरकारला बजावले होते. मात्र या तालिबान्यांविरोधात भक्कम पुरावे नसल्याचे कारण देऊन त्यांची सुटका केली जात आहे असे समजते.

काबूलजवळच्या बगराम तुरूंगात ८८ तालिबानी अतिरेकी कैदेत आहेत. पैकी चौकशीनंतर ७२ तालिबान्यांची सुटका करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता त्याला अमेरिकन सुरक्षा फौजांनी जोरदार हरकत घेतली होती. त्यानंतर पुन्हा चौकशी केली गेली आणि पुरावे नसलेल्या ६५ जणांची सुटका करण्याचा निर्णय घेतला गेला असे अफगाणिस्तानचे प्रवक्ते अब्दुल शुकुर दाद्रास यांनी सांगितले. यामुळे अफगाणिस्तान आणि अमेरिकेत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या सुरक्षा करारावर परिणाम होणार आहे. या करारानुसार २०१४ नंतरही अमेरिकन फौजा अफगाणिस्तानात राहू शकणार आहेत.

अमेरिकेच्या पेंटागॉनने अफगाण सरकारच्या या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया देताना तुरूंगातून सोडल्या गेलेल्या अतिरेकयांनी पुन्हा हल्ले केल्यास अथवा दहशत माजविल्यास त्यांना ठार केले जाईल असे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment