विविध देशांत असा साजरा होतो व्हेलेंटाईन डे

१४ फेब्रुवारीचा दिवस जगभरात विविध देशांत व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. भारत आणि यूकेत हा दिवस प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी आपल्या प्रियजनांसाठी विविध प्रकारच्या भेटी दिल्या जातात. मात्र जगातील कांही महत्त्वाच्या देशांत हा दिवस वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.

जपान आणि कोरिया या देशांत या सणाची सुरवात होते १४ फेब्रुवारीलाच मात्र तो संपतो १४ मार्चला. जपानमध्ये हा दिवस व्हाईट डे म्हणून साजरा होतो आणि या दिवशी मुली आपल्या प्रिय व्यक्तीला स्वतः बनविलेले चॉकलेट भेट देतात. ज्यांना असे स्वतः बनविलेल्या चॉकलेट मिळते त्या पुरूषांनी १४ मार्चला या भेटीची परतफेड संबंधित मुलीला गिफ्ट देऊन करायची असते. कोरियात अशीच पद्धत आहे मात्र तेथे चॉकलेट ऐवजी कँडी दिली जाते. मात्र ज्यांना अशी गिफट मिळत नाही ते तरूण तरूणी हा दिवस एकटेपणाने घालवितात आणि या दिवशी काळ्या रंगाच्या नूडल्स खातात. त्याला ब्लॅकडे असे संबोधले जाते.

स्कॉटलंड मध्ये अनोखीच प्रथा आहे. येथे १४ फेब्रुवारीला रस्त्यावर जो प्रथम तरूण अथवा तरूणी भेटेल तिलाच व्हेलेंटाईन मानले जाते मग तो तरूण अथवा तरूणी ओळखीची असो वा नसो. डेन्मार्क मध्ये या दिवशी लव्हर्स कार्ड अथवा पांढरी फुले असलेली कार्डस भेट दिली जातात आणि त्याला म्हणतात स्नो ड्राप्स. या दिवशी प्रेमगीते लिहिलेली कार्डही प्रेमिक एकमेकांना देतात. रूमानियात व्हेलेंटाईन ऐवजी द्रागोबेट च्या नावाने हा सण साजरा केला जातो. हे पुराणकथेतील एक पात्र असून क्युपिड प्रमाणेच हा प्रेमवीर होता. याच दिवशी पक्षी एंगेज होतात असा येथे समज असून पक्षी हे येथे देवाचे दूत मानले जातात.

ऑस्ट्रेलियात या दिवशी प्रेमीजन एकमेकांना सॅटीन कुशन भेट देतात त्यावर फुले पाने भरलेली असतात. तसेच चॉकलेट ऐवजी हमिंग बर्ड अथवा स्वर्गीय नर्तक हा पक्षी भेट दिला जातो. दक्षिण आफ्रिकेत हा उत्सव आठवडाभर साजरा होतो आणि मुली आपल्या ड्रेसच्या बाहीवर आपल्या प्रियकराचे नाव लावतात.