मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी राज्यात रास्ता रोको केला जाणार आहे. या आंदोलनाची माहिती देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. टोलचा प्रश्ननिकाली निघेपर्यंत मनसेचे आंदोलन सुरुच आहे. उद्याचा रास्ता रोको हा फक्त निषेध व्यक्त करण्यासाठी आहे. यानंतर २१ फेब्रुवारीला मनसेतर्फे गिरगाव चौपाटी ते मंत्रालय असा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सुरुवातीलाच दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा चालू असल्याने शाळा- कॉलेज बंद ठेवण्याची गरज नाही, परीक्षा ठरलेल्या वेळेवर होतील, त्यात कोणतीही आठकाठी येणार नाही. कोठेही कोणतीही नासधूस होणार नाही, मात्र आंदोलन खणखणीतच असेल, राज्यातील सर्व महामार्ग सकाळी नऊ बाजल्यापासून बंद करण्याचा ठाम निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आपण स्वत: वाशी टोल नाक्यावर आंदोलनात सहभागी होणार असल्याचे राज यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून मला चर्चेसाठी बोलवले जात आहे. मात्र यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. त्यातून काहीही निष्पण्ण झालेले नाही. चर्चा करायची असेल तर मी पत्रकारांना सोबत घेऊनच मंत्रालयात जाईन. उगाच आत काय घडले यावरुन आणखी फाटे फुटायला नको, राजने केली तडजोड, अशा बातम्या छापायला तुम्हाला संधा देणार नाही. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र उद्याचा रास्ता रोको आंदोलन होणारच असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच चर्चा करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांशीच करु. दरोडेखोरांशी चर्चा करण्यात काय अर्थ आहे, अशी टिका त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली आहे. या आंदोलनामुळे लोकांना त्रास होणार असला तरी तो त्यांच्या फायद्यासाठीच सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनीही या आंदोलनात सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.