मंगळावर पाणी नवे पुरावे

वॉशिंग्टन – मंगळावर बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचे नवे पुरावे अमेरिकेच्या नॅशनल एअरॉनॉटिक्स् ऍन्ड स्पेस असोसिएशन (नासा) या संघटनेच्या संशोधकांना मिळाले आहेत. सध्या नासाचे मंगळाचे निरीक्षण करणारे अंतराळ यान ओडीसी हे मंगळाच्या परिसरात भ्रमण करत असून मंगळावरील छायाचित्रे पृथ्वीवर पाठवत आहे.

मंगळावर पाणी असावे असा अंदाज आजवर व्यक्त करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात त्याची कसलीही चिन्हे दिसत नव्हती. पाण्याचे ओघळ वाहून गेल्याची चिन्हे आढळली होती आणि त्यावरून मंगळावर कधी काळी पाणी असावे असा अदमास केला गेला होता. पण आता मात्र नासाला आढळलेला पुरावा यापेक्षा निश्‍चित स्वरूपाचा आहे.

कधी काळी नव्हे तर सध्या सुद्धा मंगळावर पाणी आहे आणि ते बर्फाच्या स्वरूपात आहे, असे नासाच्या संशोधकांना आढळले आहे. मंगळाचे तापमान वाढते तेव्हा या बर्फाचे पाणी होत असावे असे नासाच्या संशोधकांचे मत आहे.