शरद पवार हेच आपले नेते- सुशीलकुमार

सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर असलेली केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे निष्ठा पुन्हा एकदा समोर आली आहे. शरद पवार हेच आपले नेते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते सोलापुरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना शिंदे यांनी शरद पवारांना नेते मानण्यास आपल्याला कोणाचीही भीती नसल्याचेही सांगितले. शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा शिंदे यांनी यापूर्वी व्यक्त केली होती त्या पार्श्वभूमीवर या विधानाला महत्व आहे. काँग्रेसचे नेते आणि देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखविली आहे. ती काँग्रेसला कितपत रुचेल हा भाग वेगळा आहे.

गेल्या काही दिवासांपासून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची तयारी काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्याचवेळी शिंदे यांनी असे वक्तव्य करून सर्वांनाच धक्का दिलाय. पवार पंतप्रधान झाले तर आपल्याला आनंद होईल, असं शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा पवार स्तुतीतून काय सिद्ध करायचंय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.