राज्यात १२ फेब्रुवारीपासून मनसेचा रास्ता रोको

मुंबई- राज्यातील टोलनाक्यांविरोधात पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला असून, १२ फेब्रुवारीपासून राज्यात रास्ता रोको करणार असल्याची घोषणा त्यांनी रविवारी केली. या आंदोलनाचे नेतृत्व आपण करणार असून जोपर्यंत टोलबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत आणि खोटे टोल नाके बंद नाहीत, तोवर आंदोलन आंदोलन सुरुच राहिल. हिंमत असल्यास सरकारने मनसेला अडवून दाखवावे, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. पुणे येथील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विराट सभा झाली.

या सभेत त्यांनी खोट्या टोलचा पोलखोल केला. रस्ते वापरताना वाहनांना १३ प्रकारचे कर भरावे लागतात. टोल हा १४ वा कर आहे. एकट्या वाहन करातून २००० ते २०११ या कालावधीत २२,२६६ कोटी रुपयांची कर वसुली झाली. मग अन्य १३ करातून किती रक्कम वसूल होत असेल, असा सवाल त्यांनी केला. कर्नाटकमधील टोल हे केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे चालवले जात आहेत. परंतु राज्यातील हे धोरण राबवले जात नाही. कर्नाटकमध्ये प्रत्येक २-३ कि.मी.वर एक शौचालय आणि प्रवासी थांबा आहे. परंतु मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर केवळ दोन शौचालये सोडल्यास कोणतीही सुविधा नाही, याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला.

आमचा टोलला विरोध नाही. वसूल झालेल्या टोलचे नेमके काय होते, हा आमचा प्रश्न आहे. टोलच्या वसुलीची माहिती आता मोबाइल ‘अ‍ॅप्स’द्वारे फेसबूकच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात कोणत्याही दुकानांमध्ये लाल व पिवळया दिव्यांची कशी बेकायदेशीर विक्री होते हे दाखवून दिले. तब्बल दोन पिशव्याभर हे दिवे मी खरेदी केले. त्यामुळे खुलेआम हे दिवे विकले जात असतील तर दहशतवादी हल्ले कसे होणार नाहीत,असा सवालही त्यांनी केला. टोलवरून शिवसेनेवर शरसंधान साधत राज ठाकरे यांनी आम्ही टोलबाबत सरकारविरोधात लढतोय आणि शिवसेना आम्हाला टार्गेट करतेय. त्यामुळे ही शिवसेना सरकारबरोबर आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment