मतपेढीचे राजकारण

आपल्या देशाचे राजकारण अजूनही मतपेढ्यांच्या हिशेबातून मुक्त होत नाही आणि राजकारणी नेत्यांना त्यांचा लाभ घेण्याचा मोहही आवरत नाही. हिदूं आणि मुस्लिम या दोन पेढ्या जशा राजकारणात धुमाकूळ घालत असतात तशाच सवर्ण आणि दलित अशाही दोन मतपेढ्या आहेत. आता या पेढयांचे राजकारण करताना सर्वांना हुशारी करता येतेच असे नाही. काही नेत्यांना आपली या राजकारणातली तिरपीट लपवता येत नाही.राहुल गांधी यांनीही अशीच भूमिका घेतली आहे. ते कधी देशातल्या गरीब दलितांचा कैवार घेतात तर कधी त्यांच्या विरोधात धोरण आखतात. गरीब आणि दलित तसेच अल्पसंख्यक हे तर त्यांचे बांधलेले मतदार आहेत असे त्यांना वाटत असते पण त्यांना प्रत्यक्षात राजकारण करायचे आहे ते श्रीमंतांच्या हिताचे. त्यांची गोची नेमकी हीच आहे. ओदिशात काल राहुल गांधी यांची हीच कसरत उघड झाली. ओदिशा हे देशातले सर्वात संपन्न राज्य आहे. तिथे देवदुर्लभ खनिजे आहेत. त्यांचा नीट वापर केला तर या राज्याला सर्वात श्रीमंत राज्य होण्याची संधी आहे. पण या राज्यातले सरकार याबाबत काही करू शकले नाही अशी नेमकी मांडणी त्यांनी ओदिशात केली. अर्थात क्षमता असतानाही प्रगती न होण्यास या राज्यातले बिजू जनता दलाचे सरकार जबाबदार आहे असे त्यांना म्हणायचे होते.

राहुल गांधी हे क्षमता आणि प्रगतीचे कोष्टक केवळ ओदिशातच जाऊन मांडतात. ज्या राज्यात या विसंगतीचे माप त्यांच्या पदरात पडणार आहे त्या राज्यात ते हा मुद्दा उपस्थित करीत नाहीत. उदाहरणार्थ आसाम आणि पूर्वोत्तर राज्ये. तिथे कॉंग्रेसला क्षमतांचा कमाल वापर करून प्रगती करता आलेली नाही. तिथे नरेन्द्र मोदी यांनी सभा घेतल्या आणि आसामच्या गरिबीला कॉंग्रेसच कशी कारणीभूत आहे हे दाखवून दिले. ओदिशातली गरिबी हा विषय तिथल्या आदिवासींच्या जिव्हाळ्याचा आहे आणि त्या गरिबीला बिजू जनता दल जबाबदार आहे असे दाखवण्याची संधी आहे हे दिसायला लागले की, राहुल गांधी यांना चेव येतो. पण त्यांना हे लक्षात नाही की, या ओदिशातल्या गरिबीशी आपला थेट संबध आहे. दोन वर्षांपूर्वी ओरिसातल्या नियामगिरी डोंगराच्या परिसरात काही खाणींच्या उत्खननाचे पट्टे दिले जात होते. तिथल्या आदिवासींचे त्या निमित्ताने पुनर्वसन करावे लागणार होते. पण त्यांनी पट्टे देण्यास विरोध केला. असा प्रकार केवळ ओदिशातच सुरू आहे असे नाही तर जिथे औद्योगिक प्रकल्पासाठी जमिनी संपादित कराव्या लागत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जमिनी जाणारांचा विरोध होत आहे. नियामगिरी डोंेगरांच्या पट्टयात जमीन संपादन करणारे सरकार आपले नाही आणि आदिवासी लोक त्याला विरोध करीत आहेत असे दिसायला लागताच राहुल गांधी तिकडे धावले.

येथे आदिवासींची मते मिळवण्याची संधी आहे असे दिसताच त्यांनी तिथे जमीन संपादनाला विरोध केला. आता ओदिशाची प्रगती होत नाही असा टाहो ङ्गोडून त्यांनी कितीही नाटक केले तरीही ही प्रगती न होण्यास त्यांचेच आंदोलन कारणीभूत आहे हे त्यांच्या लक्षात नाही. म्हणजे प्रगती होऊ नये म्हणून त्यांनीच प्रयत्न करायचे आणि प्रगती झाली नाही तरी त्यांनीच बिजद सरकारवर टीका करायची अशी ही दुहेरी चाल आहे. अर्थात या दुहेरी चालीत राहुल गांधी काही गोष्टी योजनापूर्वक करीत आहेत असे नाही. तिथे आंदोलन सुरू झाले तेव्हा ते विचार न करता तिकडे धावले. सगळ्या देशातल्या आदिवासींची आणि जमीन मालकांची बाजू घेतली तर आपली लोकप्रियता वाढेल असे त्यांना वाटले. या पलीकडे त्यांच्या डोक्यात कसलाही विचार आला नाही. अतीशय उथळ विचार हाच त्यांचा आधार आहे. आताही त्यांनी ओदिशातल्या मतदारांची मने जिंकायची असतील तर आपल्याला तिथल्या गरिबीवर आणि क्षमतेवर बोलावे लागेल असा विचार केला.

आपल्या या परस्पर विरोधी मतांतला असमतोल त्यांना माहीत नाही. तेवढी पोच त्यांना नाही. समाजातल्या एखाद्या घटकाला आकृष्ट करायचे असेल तर त्या समाज घटकासाठी प्रत्यक्षात काही काम करावे लागते याची त्यांना जाणीव नाही. एखाद्या जाहीर सभेत त्या समाज घटकासाठी काही वाक्ये टाकली की त्या घटकाची मते आपल्याला मिळतात असा त्यांचा समज आहे. त्यातूनच ते सभांत असे परस्पर विरोधी दावे करीत असतात सध्या देशातल्या राजकारणात आरक्षण हा असाच एक नाजुक आणि संवेदनशील मुद्दा झाला आहे. एखाद्या जातीला आरक्षण देण्याची मागणी केली की त्यांची मते आपल्याला मिळालीच समजा असा त्यांचा विचार आहे, याच विचारातून त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांच्या आरक्षणाचा विषय पुढे केला होता. पण या समाजाने त्यांच्या आश्‍वासनाच्या आमिषावर विश्‍वास ठेवण्यास नकार दिला. परिणाम काय झाला हे आपणा सर्वांना माहीत आहे. केवळ २८ जागा मिळाल्या. म्हणजे त्यांना आपल्या राजकारणातून जनतेपर्यंत जो संदेश पाचवायचा असतो तो नीट पोचवताही येत नाही. एकदा लोकांनी त्यांच्या या राजकारणाचा खातमा करायला हवा आहे. लोक आपल्या जातिगत भावनांपासून उठणार नहीत तोपर्यंत त्यांना हे समजणार नाही. आपल्या देशातल्या नेत्यांना जातीची भावना जागी करून आपली मतांंची झोळी भरून घेण्याचा मोहही होता कामा नये इतकी लोकांंनी जातीच्या भेदांंंना ङ्गारकत दिली पाहिजे.

Leave a Comment