भारताचा ४० धावांनी पराभव, न्यूझीलंडची मालिकेत आघाडी

ऑकलंड – न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ४० धावांनी पराभव झाला. न्यूझीलंडने ठेवलेल्या ४०७ धावांच्या खडतर आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताला केवळ ३६६ धावा करता आल्या. या पराभवासोबतच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात सुमार कामगिरी केल्यानंतर दुस-या डावातील गोलंदाजांच्या प्रभावी मा-या मुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र चौथ्या दिवशीच्या खेळात फलंदाजांच्या साधारण कामगिरीने पुन्हा एकदा भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मोठय़ा आव्हानाचा पाठलाग असूनही दुस-या डावात भारताने चांगली सुरुवात केली.

तिस-या दिवसअखेर भारताला विजयासाठी ३२० धावांची आवश्यकता होती. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा खेळत होते. शिखर धवनने ११५ धावांच्या जोरावर डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला विराट कोहलीचीही(६७) साथ लाभली. मात्र बाकी फलंदाज पटापट बाद झाले. त्यावेळी महेंद्रसिंग ढोणी आपल्या बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताला विजयासाठी ४५ धावांची आवश्यकता असताना ढोणीही बाद झाला. त्यानंतर आलेल्या ईशांत शर्मालाही मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने भारताला ४० धावांनी पराभव पत्करावा लागला यापूर्वी दुस-या डावात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती. नवोदित मोहम्मद शामीसह इशांत शर्मा (प्रत्येकी तीन विकेट) आणि झहीर खानने (दोन विकेट) अचूक मारा करताना यजमानांना ४१.२ षटकांत १०५ धावांत गुंडाळले.

न्यूझीलंडच्या केवळ चार फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्यात रॉस टेलरने सर्वाधिक ४१ धावा केल्या. शामीने सुरुवातीपासूनच प्रभावी मारा करताना यजमान फलंदाजांची त्रेधातिरपीट उडवली. त्याने पहिल्याच षटकात सलामीवीर हमिश रुदरफर्डला (५) रवींद्र जडेजाकडे झेल देण्यास भाग पाडले. पुढच्या षटकांत पीटर फुल्टनला (०) पायचीत पकडले. अनुभवी झहीर खानने फॉर्मात असलेला केन विल्यमसनचा (३) अडथळा दूर केला. पहिल्या डावातील द्विशतकपटू, कर्णधार ब्रेंडन मॅककलमला (१) मुरली विजयने स्लिपमध्ये दिलेले जीवदान महागात पडेल, असे वाटले. मात्र झहीरच्या त्याच षटकात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात जडेजाच्या अचूक ‘थ्रो’वर इशांतने मॅककलमला धावचीत केले वास्तविक पाहता ४ बाद १३० वरून पहिला डाव २०२ धावांत संपल्यानंतर यजमान भारतावर फॉलोऑन लादतील, असे वाटले. मात्र कर्णधार ब्रेंडन मॅककलमने पुन्हा फलंदाजी करणे, पसंत केले.

पाहुण्यांच्या उर्वरित सहा फलंदाजांना केवळ ७२ धावा करता आल्या. नाबाद फलंदाज अजिंक्य रहाणे (२६) आधीच्या धावसंख्येत केवळ तीन धावांची भर घालून परतला. रोहित शर्मालाही (७५) आणखी पाच धावा जोडता आल्या. अष्टपैलू रवींद्र जडेजाने नाबाद ३० धावांचे योगदान दिल्यामुळे भारताला दोनशेची मजल मारता आली. न्यूझीलंडतर्फे वेगवान गोलंदाज नील वॅग्नर (४ विकेट) सर्वात यशस्वी ठरला. ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी या अन्य वेगवान दुकलीने प्रत्येकी तीन विकेट घेत यजमानांना मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Leave a Comment