अमेरिकेत शस्त्रक्रियेशिवाय बसवला ‘पेसमेकर’

न्यूयॉर्क- नैसर्गिकरीत्या हृदयाचे ठोके पडत नसल्यास रुग्णाला ‘पेसमेकर’चा आधार घ्यावा लागतो. तो बसवण्यासाठी यापूर्वी शस्त्रक्रिया करावी लागत होती, मात्र भारतीय डॉक्टर विवेक रेड्डी यांनी शस्त्रक्रियेशिवाय रुग्णाच्या ह्रदयात पेसमेकर बसवण्याचा जगातील पहिलाच प्रयोग अमेरिकेत यशस्वी केला.

त्यांच्या या प्रयोगामुळे जगभरातील लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या पेसमेकरचे नामकरण ‘नॅनोस्टीम’ असे केले आहे. आकाराने लहान असलेला हा पेसमेकर शिसेविरहित असून शस्त्रक्रियेशिवाय कॅथेटरच्या सहाय्याने सहजपणे रुग्णाच्या शरीरात बसवता येतो. द माउंट सिनाई हॉस्पिटलमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या अनेक क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. येत्या काळात अमेरिका, कॅनडा, युरोपातील ६७० रुग्णांवर नवीन संशोधनाने पेसमेकर बसवण्याचे नियोजन केले आहे.

यात शिसे नसल्याने हा पेसमेकर अत्यंत सुरक्षित आहे. रुग्णाच्या छातीच्या त्वचेखालून तो आता सरकवायचा आहे, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले. जगात ४० लाख रुग्ण पेसमेकर वापरत असून दरवर्षी सात लाख नवीन रुग्णांना पेसमेकरची गरज भासत असते. या नवीन शोधामुळे रुग्णाच्या हालचालींवर कोणतेही निर्बंध येत नाहीत. तसेच रुग्णांना इन्फेक्शन होण्याची भीती नसते, असेही डॉ. रेड्डी म्हणाले.

Leave a Comment