पवारांना एनडीएत यायचे होते, मी विरोध केला

माजलगाव – शरद पवारांना एनडीएत यायचे होते; पण आपण त्याला कडाडून विरोध केल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी माजलगाव येथे रविवारी केला. देशभरात सध्या परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळेच शरद पवारांनी मोदींची भेट घेतली. ही भेट घेण्यासाठी पवारांना दहा वर्षात वेळ मिळाला नाही का, असा टोमणा मारतानाच निवडणुकीआधी राष्ट्रवादीशी कधीही समझोता करणार नाही, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

माजलगावातील मोंढा मैदानावर दारिद्य्र रेषा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुंडे म्हणाले, आम्ही पाच पांडवांनी भाजपा, शिवसेना, रिपाई, स्वाभीमानी संघटना आणि रासपने युती केली आहे. आता कोणाचीही गरज नाही. बीडमध्ये माझ्याविरुद्ध उमेदवार शोधण्यासाठी शरद पवार व अजित पवार तीन ते चार महिन्यांपासून मायक्रोस्कोप घेऊन बसले आहेत; पण जिल्ह्यातील अर्धी राष्ट्रवादी माझ्याकडून असल्याने एकही उमेदवार तयार होत नाही. त्यांना उमेदवार मिळाला, तरी मी लाखो मतांच्या आघाडीने निवडून येईल.

दारिद्य्र रेषेच्या यादीत आजही आमदार, खासदारांची नावे आहेत. खरे लाभार्थी यापासून वंचित आहेत. दलालांमुळे गरिबांपर्यंत धान्य पोहचत नाही. त्यामुळे दलालांना जेलमध्ये घालण्याचे काम मी करणार आहे.

Leave a Comment