डोळ्याखालची काळी वर्तुळे

साधारण चाळीशी गाठली की रुपातला चार्म जायला लागतो, शरीर सुटायला लागते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्याखाली काळी वर्तुळे यायला लागतात. डोळ्यातली चमक कमी होते. दगदग, काळजी आणि मानसिक तणाव त्याचबरोबर जागरण यामुळे काळी वर्तुळे येतात. मात्र ती कशाने घालवावीत याबाबत ङ्गार संभ्रम निर्माण होतो. त्यावर काही रासायनिक औषधे किंवा क्रीम वापरायला लागलो की उलटा परिणाम होऊ शकतो. काळी वर्तुळे तर आहे तिथेच राहतात आणि दुसर्‍याच काही समस्या उद्भवू शकतात कारण बाजारात मिळणार्‍या क्रीम्स्मध्ये काळी वर्तुळे घालवणारी क्रीम्स् उपलब्ध नाहीत मात्र काही वनस्पती आणि भाज्या यांचा वापर केला तर ही वर्तुळे थोडीसी ङ्गिकट होऊ शकतात.

त्यावर एक सोपा उपाय म्हणजे काकडीचा रस काढा आणि तो चेहर्‍याला लावा किंवा तो थोडा असेल तर तो डोळ्याभोवती लावा. दहा ते पंधरा मिनिटे त्याठिकाणी ठेवा आणि पंधरा मिनिटांनी धुवून टाका. त्यामुळे डोळ्यावरचा ताण कमी होईल. हाच काकडीचा रस बटाट्याच्या रसात मिसळून तो चेहर्‍याला लावून असाच दहा पंधरा मिनिटे ठेवून तो स्वच्छ पाण्याने धुवावा. त्याने काळी वर्तुळे तर ङ्गिकट होतातच परंतु काही कारणांनी चेहर्‍याला सूज आली असेल तर ती सूज उतरण्याससुध्दा मदत होते.

डिप डिप चहा पिण्यासाठी जी चहाची पिशवी वापरली जाते ती पिशवी चहाच्या पावडरसह ङ्ग्रीजमध्ये ठेवावी आणि थंड अवस्थेतली पिशवी डोळ्याखालच्या वर्तुळावरून ङ्गिरवावी. तिचाही उपयोग होतो. दुसरा एक उपाय म्हणजे टोमॅटोचा रस पिणे. टोमॅटोचा रस काढून त्यात पुदिन्याची चार पाने टाकावीत आणि हा रस प्रत्येक वेळी एक ग्लास या प्रमाणे दोन वेळा प्यावा. पंधरा दिवस हा प्रयोग केल्यास डोळ्याखालच्या वर्तुळावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करावा. त्यापेक्षा आणखी एक उपाय आहे पण तो महागडा आहे. बदाम कुटून घ्यावा. त्याची पावडर दुधामध्ये कालवावी आणि ती घट्ट पेस्ट डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळावर लावावी हा प्रयोग काही दिवस केल्याने वर्तुळे केवळ जातातच असे नाही तर डोळ्याचा तो भाग विशेष चमकदार होतो.