रोमांचक लढतीत टीम इंडिया पराभूत

ऑकलंड: रोमांचक स्थितीत आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळविता आला नाही. टीम इंडियाकडून शिखर धवनने झळकाविलेल्या शतकानंतर विजयासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. न्यूझीलंडने या सामन्यात ४० धावांनी विजय मिळवून, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

तिस-या दिवशीच या कसोटीत न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिले होते. त्यानतर सलामीच्या शिखर धवनने धडाकेबाज शतक झळकावूनही टीम इंडियाचा दुसरा डाव ३६६ धावांत आटोपला. या कसोटीत भारतानं तिस-या दिवसअखेर एक बाद ८७ धावांची मजल मारली होती. भरवशाचा चेतेश्वर पुजारा चौथ्या दिवशी सकाळी झटपट बाद झाला. पण शिखर धवननं विराट कोहलीच्या साथीनं तिस-या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी रचून, भारतीय आव्हान कायम राखले.

धवननं कारकीर्दीतले दुसरे कसोटी शतक झळकावलं. पण कोहली आणि धवन २६ धावांच्या अंतरात बाद झाले आणि टीम इंडिया संकटात सापडली. मग दुस-या नव्या चेंडूवर न्यूझीलंडनं अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनाही लागोपाठच्या षटकात माघारी धाडले. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात जावा, तशी टीम इंडियाची अवस्था झाली. धोनी आणि जाडेजा यांनी त्या कठीण परिस्थितीत मोठे फटके खेळून विजयश्री खेचून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

Leave a Comment