औरंगाबाद लोकसभा शिक्षणमंत्री दर्डांनी लढवावी असा अहवाल

औरंगाबाद – आगामी काळात होत असलेली लोकसभा निवडणूक शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा अहवाल काँग्रेसच्या प्रदेश पदाधिका-यांनी राज्य समितीकडे पाठवला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे दर्डा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात ते लोकसभा निवडणूक लढविणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद लोकसभेवर गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेची पकड कायम आहे. केवळ १९९६ साली रामकृष्णबाबा पाटील यांचा अपवाद वगळता गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत चंद्रकात खैरे निवडून आले आहेत. निकालानंतर झालेल्या पक्षांतर्गत बैठकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार मजबूत नसल्याने पराभवाचे तोंड पाहावे लागले, असा सूर लावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ताब्यातून मतदारसंघ हिसकावून घेण्याची क्षमता असलेला नवीन उमेदवार यंदा द्यावा, असा प्रयत्न प्रदेश कार्यकारिणीकडून होत आहे.

राहूल गांधी यांच्या निर्देशानुसार पदाधिका-यांच्या मतदानातूनच उमेदवाराची निवड होणार असली तरी खैरेंना तुल्यबळ कोण ठरू शकतो, याविषयी चाचपणी करण्यात आली. त्यानुसार प्रदेश कार्यकारिणीवर असलेल्या पदाधिका-यांनी एक अहवाल पाठवला आहे. त्यात दर्डा हेच खैरेंना टक्कर देऊ शकतात आणि विजयी होऊ शकतात असे स्पष्ट करून शालेय शिक्षणमंत्रिपदामुळे दर्डांचा जनसंपर्क वाढला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याामुळे आगामी काळात दर्डा लोकसभेची निवडणूक लढविणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment