बाहरिन – बाहरिनमध्ये गेल्या वर्षी एका चित्त्याला माणसाळवल्यामुळे एक भारतीय प्रसिद्धीच्या झोतात आला असून आखाती देशांतून त्याची मागणी वाढली आहे. ख्रिस्तो बाबू असे त्याचे नाव असून, अतिशय धोकादायक आणि हिंस्त्र प्राण्यांना माणसाळवण्याची कला त्याला अवगत असून त्याच्या या कौशल्यामुळे त्याला ‘वुल्फ’ असे टोपण नाव मिळाले आहे.
हिंस्त्र प्राण्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याच्याकडे ओमानमधून अनेक प्रस्ताव आले आहेत. पाच चित्ते आणि चार बिबट्यांना प्रशिक्षण देण्याचे प्रस्ताव त्याने स्वीकारले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ख्रिस्तो बाबू हा एक सुशिक्षित तरुण असून त्याने बिझनेस मॅनेजमेंटमधील पदवी मिळवलेली आहे. आखाती देशातील श्रीमंतांमध्ये चित्ते आणि बिबटे यांच्यासारखे हिंस्त्र प्राणी पाळण्याचे वेड आहे. त्यांच्या नातेवाइकांसमोर हे प्राणी शांत राहावेत आणि त्यांना वाळवंटामध्ये फिरायला घेऊन जाता यावे, अशी या प्राणी मालकांची इच्छा असते.
ओमानमधील एका शाही कुटुंबाच्या मालकीच्या चित्त्याला ख्रिस्तो बाबू याने प्रशिक्षण दिल्यावर त्याची प्रसिद्धी संपूर्ण आखातात पसरली. याचे कारण म्हणजे या चित्त्याला प्रशिक्षण देण्यामध्ये तब्बल सात प्रशिक्षकांना अपयश आल्यावर बाबूने त्याचे कौशल्य दाखवून जवळजवळ अशक्य ठरलेली गोष्ट शक्य करून दाखवली. तो चित्ता म्हणजे एक मादी होती. तिच्या संपर्कात राहून, तिचा विश्वास संपादन करून बाबूने तिला प्रशिक्षण दिले.
सुरुवातीला ताटात मांसाचे काही तुकडे ठेवल्यावर हे तुकडे घेऊन चित्त्याची मादी पळून जात असे. पण नंतर बाबूने मांसाचे तुकडे ताटाला बांधून ठेवले आणि तो जवळच उभा राहिल्यामुळे त्या मादीला त्याच्या जवळ राहूनच ते खावे लागले. या प्रक्रियेतून त्या मादीला माणसाच्या सहवासाची सवय झाली, असे बाबू सांगतो. हिंस्त्र प्राण्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये आणखी प्रावीण्य मिळवण्याचा मानस बाबूने व्यक्त केला आहे. त्याने जर्मनीमधून कुत्र्यांना प्रशिक्षित करण्सयाचे प्रशिक्षणही घेतले आहे.