पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची अखेर आज (शुक्रवार) बदली झाली असून, मुद्रांक शुल्क विभागाच्या महानिरीक्षकपदी परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतः परदेशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 18 महिन्यांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आहे. राजीव जाधव हे पुढील आयुक्त असणार आहेत. परदेशी यांची मुदतीपूर्वी बदली न करता कार्यकाळ पूर्ण करू देण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. शहरातील विविध संघटनांनी स्वाक्षरीच्या माध्यमातूनही पाठिंबा दर्शविला होता.
आयुक्तांनी कमी कालावधीत जनसामान्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता प्रशासकीय घडी बसविली होती. त्यांच्या शिस्तबद्ध कारभारामुळे आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचे परिवर्तन होऊन नवचैतन्य निर्माण झाले होते. यामुळे शहराच्या विकासात भर पडली होती. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य ग्राहक सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, गजानन बाबर यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवून डॉ. परदेशी यांची बदली करण्यास विरोध दर्शविला होता.