लॉर्डसवर रंगणार सचिन विरुध्द वॉर्न सामना

लंडन – सचिन तेंडुलकर फलंदाजी करत असताना, शेन वॉर्न त्याला गोलंदाजी करतोय हे व्दंद म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच असायचे. इंग्लिश क्रिकेट चाहत्यांना या दोन महान खेळाडूंमधील हे व्दंद पुन्हा एकदा याचि देही याची डोळा पाहता येणार आहे. लॉर्डस मैदानाला २०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक मैत्रीपूर्ण सामना आयोजित करण्यात आला आहे.

पन्नास षटकांच्या या सामन्यामध्ये सचिन मेरिलिबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) तर, शेन वॉर्न शेष जागतिक संघाचे नेतृत्व करणार आहे. पाच जुलैला लॉर्डस मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. एमसीसीच्या संघामध्ये सचिनसह राहुल द्रविडचाही समावेश आहे. एमसीसीचे नेतृत्व करायला मिळणे हा एक बहुमान आहे. मी आनंदाने हे निमंत्रण स्वीकारले आहे असे सचिनने सांगितले. लॉर्डस हे क्रिकेटचे घर आहे त्यामध्ये खेळायला मिळणे हा एक सन्मान आहे. हा सामना भरपूर आनंद देईल असे शेन वॉर्नने म्हटले आहे.

या सामन्यामध्ये जागतिक क्रिकेटमधील नावाजलेले क्रिकेटपटू खेळणार असून, येत्या काही दिवसात त्यांची नावे जाहीर होतील एमसीसीचे अध्यक्ष माईक गॅटीग यांनी सांगितले. सचिन आणि वॉर्नमधील संघर्षात नेहमीच सचिन वरचढ ठरला आहे. शारजातील सचिनची अफलातून खेळी आजही वॉर्नच्या स्मरणात असेल. या सामन्यानंतर वॉर्नने सचिन आपल्या स्वप्नात येऊन षटकार ठोकताना दिसतो असे एका मुलाखतीत सांगितले होते.

Leave a Comment