फळ प्रक्रियेचे मधूर फळ

महाराष्ट्रातील केळी, आंबा, द्राक्ष, संत्री, मोसंबी आणि स्ट्रॉबेरी या फळांची निर्यात मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे आणि त्याचे आपल्याला खूप कौतुक वाटत आहे. परंतु या ताज्या फळांच्या निर्यातीमध्ये एक गोम आहे आणि तिच्यानुसार ताजी फळे फार निर्यात करणे हे काही फार कौतुकाचे नाही. फळे ताज्या स्वरूपात निर्यात करून विकण्यापेक्षा त्या फळांवर प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त माल विकला तर जास्त पैसा मिळत असतो. म्हणजे आपण आता भरपूर फळे निर्यात करत आहोत. त्यापेक्षा त्या फळांवर प्रक्रिया करून तो पक्का माल बाजारात विकला तर आपल्याला त्यापेक्षा किती तरी अधिक पैसा मिळणार आहे. शेतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक वचन नेहमी सांगितली जाते की, जो कच्चा माल बनवतो तो नेहमीच दरिद्री राहतो, मात्र जो कच्चा माल स्वस्तात घेऊन त्यापासून पक्का माल तयार करतो तो मात्र श्रीमंत होतो. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी कच्च्या मालाचे पुरवठादार न होता पक्क्या मालाचे उत्पादक व्हायला शिकले पाहिजे. तसे केल्यास काय होते याचा अनुभव महाराष्ट्राला बेदाण्याच्या व्यापारात व्हायला लागला आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या पश्‍चिम भारतातल्या चार राज्यांमध्ये फळे आणि भाजीपाला यांचे एवढे उत्पादन होऊ शकते की, सार्‍या जगाला ही उत्पादने आपण पुरवू शकतो. विशेषत: महाराष्ट्रामध्ये फळांच्या उत्पादनाची क्षमता अफलातून आहे. द्राक्ष, डाळिंब, बोर, केळी, पेरू, नारळ, आंबा, चिकू ही फळे महाराष्ट्रात उत्तम पिकवता येतात आणि ती परदेशात निर्यात करून करोडो रुपयांचे परकीय चलन मिळवता येते. ही क्षमता कितीही मोठी असली तरी महाराष्ट्राला उसाचे वेड लागले आहे. अर्थात ज्यांना गांभीर्याने शेती करायचे आहे ते शेतकरी मात्र उसाचे वेड कमी करून फळबागायतीमध्ये नाव काढायला लागले आहेत. फळे पिकवणे आणि फळांवर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेला माल परदेशात निर्यात करणे या व्यवसायात सुद्धा महाराष्ट्राची चांगली प्रगती व्हायला लागली आहे. २०११-१२ साली महाराष्ट्रातून १० हजार टन बेदाणा निर्यात झाला होता. पण नंतरच्या केवळ एका वर्षात या निर्यातीत तिप्पट वाढ झाली आणि ३० हजार टन बेदाणा निर्यात झाला.

भारतातून १ लाख १० हजार टन बेदाणा परदेशी निर्यात केला जातो. त्यातला ३० हजार टन बेदाणा एकट्या महाराष्ट्राचा आहे. खरे म्हणजे महाराष्ट्राची बेदाणा निर्मितीची क्षमता अफाट आहे. पण ती क्षमता वाढविण्याचा प्रयत्न म्हणावा तशा गांभीर्याने होत नाही. तसा तो झाला तर महाराष्ट्र हे सुद्धा काजूच्या पाठोपाठ बेदाणा सुद्धा निर्यात करणारे मोठे केंद्र ठरू शकतो. बेदाणा हा द्राक्षापासून बनवला जातो. सोलापूर, सांगली, नगर, पुणे आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या पाच जिल्ह्यांसह पूर्ण महाराष्ट्रातले द्राक्ष उत्पादक शेतकरी आता केवळ द्राक्षांचे उत्पादन न घेता द्राक्षापासून बेदाणा बनवायला लागले आहेत. गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यातल्या तासगाव येथे बेदाणा महोत्सव पार पडला. या महोत्सवामध्ये बेदाण्याची निर्मिती आणि निर्यात आपल्या जीवनामध्ये किती मोठा बदल घडवू शकते याचे प्रत्यंतर सर्वांना आले. कालच तासगावच्या बेदाण्याच्या मार्केटमध्ये ११५ रुपये किलो असा भाव मिळाला आहे. द्राक्षापासून जेवढे उत्पन्न मिळते त्याच्या दुप्पट उत्पन्न बेदाण्यापासून मिळते.

द्राक्षावर प्रक्रिया केल्याचा परिणाम म्हणून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट वाढते. ११५ रुपये प्रती किलो हा शेतकर्‍यांना मिळणारा भाव आहे. त्यांच्याकडून ११५ रुपयांनी विकत घेतलेला बेदाणा व्यापारी त्यापेक्षा अधिक किंमतीला विकतात. हा बेदाणा शेतकर्‍यांनी थेट विकला तर त्याला यापेक्षा चांगला भाव मिळू शकतो. मात्र शेतकर्‍यांनी थेट विक्री करण्याची गरज आहे. जगामध्ये महाराष्ट्रातल्या बेदाण्याला मोठी मागणी आहे, कारण जगाच्या एकूण बेदाण्याच्या उलाढालीमध्ये भारताचा हिस्सा वाढत चालला आहे. तो आता १० टक्के आहे, परंतु प्रयत्न करून त्याला २० टक्क्यापर्यंत नेणे फारसे अवघड नाही. आता होत असलेल्या उत्पादनातून सोलापूर, सांगली या दोन जिल्ह्यातच वर्षाला बाराशे कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा आकडा हाती आलेला आहे. एकंदरीत या प्रयत्नाला गती मिळाली तर ही उलाढाल कित्येक पटींनी वाढू शकते आणि महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये बेदाण्याच्या उलाढालीतून मोठी समृद्धी येऊ शकते. या व्यापारी केंंद्रात शेतकर्‍याला ११५ रुपये भा मिळतो, परंतु व्यापारी आणि मध्यस्थ यांना टाळून हा महाराष्ट्रातला बेदाणा थेट परदेशी निर्यात केला तर ११५ रुपयांच्या ऐवजी ३०० रुपये प्रती किलो भाव मिळू शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment