तरुण वयातच पार्किन्सन्स

पार्किन्सन्स डिसिज किंवा कंपवात हा मेंदूचा स्नायूवरला ताबा सुटल्यामुळे होणारा विकार आहे. आपल्या शरीरातल्या एकेक नियंत्रण व्यवस्था वाढत्या वयानुसार क्षीण होत जातात आणि त्यातूनच अशा प्रकारचे विकार उद्भवतात. त्यामुळे कंपवातासारखा विकार हा वृद्धापकाळातच होणार असे गृहित धरलेले असते आणि सर्वसामान्यत: ते खरेही आहे. हा मेंदूचा विकार आहे आणि अलीकडच्या काळात असे लक्षात यायला लागले आहे की, तुलनेने तरुण रुग्ण सुद्धा या विकाराला बळी पडत आहेत. दिल्लीतल्या निजाम्स् इन्स्टिट्यूट ऑङ्ग मेडिकल सायन्सेस (एनआयएमएस) या संस्थेत अशा रुग्णांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत आणि असे आढळले आहे की, दर महिन्याला या रुग्णालयात पार्किन्सन्स डिसिजचे ४० वर्षांच्या आतील किमान चार रुग्ण येत आहेत.

दिल्लीतल्या अन्यही काही संस्थांनी अशी नोंद केली आहे. या विकाराच्या बाबतीत एक गोष्ट अशी दिसून आली आहे की, त्यामागची कारणे आनुवंशिक नसून प्रामुख्याने पर्यावरणीय आहे. माणसाच्या शरीरातील मज्जासंस्थेमध्ये मेंदूकडून डोपामाईन नावाचे द्रव तयार होते. डोपामाईनच्या साह्याने मेंदू शरीराच्या सर्व स्नायूंवर नियंत्रण ठेवतो. मेंदूतील डोपामाईन तयार करणार्‍या पेशी जेव्हा क्षीण होतात तेव्हा डोपामाईन तयार होत नाही आणि मेंदूचा स्नायूवरील ताबा सुटतो. मात्र या मेंदूतल्या पेशी क्षीण का होतात आणि त्यामागची नेमकी कारणे कोणती, याचा छडा लावण्यात अजून तरी शास्त्रज्ञांना यश आलेले नाही.

डोपामाईनची निर्मिती पूर्णपणे थांबली की, शरीरातल्या एकेका संस्थेवरचा मेंदूचा ताबा असा काही सुटतो की, रुग्णाला मूत्र आणि मल विसर्जन करण्याची सुद्धा जाणीव रहात नाही आणि त्याला पूर्णपणे सहाय्यकाच्या मदतीवर अवलंबून रहावे लागते. दिल्लीमध्ये असा ३४ वर्षांचा एक रुग्ण आढळला आहे. अमेरिकेतील चित्रपट अभिनेता मायकेल जे ङ्गॉक्स् याला पार्किन्सन्स डिसिज झाला होता. १९९१ साली त्याच्या या विकाराचे पहिले निदान झाले आणि त्याची प्रकृती वरचेवर खालावत गेली. शेवटी त्याने चित्रपटात काम करणे सोडून दिले. त्यानंतरच्या काळात त्याने आपली सारी संपत्ती या विकारावर केल्या जाणार्‍या संशोधनाच्या कामाला अर्पण केली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment