शिवस्मारकासाठी १०० कोटींची तरतूद

मुंबई – अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्या बाबतचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शिवाय या स्मारकासाठी आवश्यक असलेली जागाही निश्चित करण्यात आली आहे. त्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हे स्मारक लवकरच मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी राज्य सरकारच्यावतीने जागा निश्चित करण्यात आली आहे. हे स्मारक जवळपास १५ .९६ हेक्टर जागेत होणार आहे. ही जागा राजभवनापासून समुद्रामध्ये १.२ किलोमीटर लांब आहे. हेच अंतर गिरगाव चौपाटी पासून तीन किलोमिटर तर नरिमन पॉईंट पासून २.६ किमी एवढे आहे. स्मारकाच्या जागेवर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, मेरीटाईम बोर्ड आणि आयआयटी पवई यांनी अन्वेषण आणि सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. आता या स्मारकाचे आराखडे तयार करणे, पर्यावरण मंत्रालयाकडून वेगवेगळ्या परवानग्या घेणे यासाठी १०० कोटींची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

शिवाय प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासही मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान शिव स्मारकाची जागा सीआरझेड चारमध्ये येते. त्यामुळे हे स्मारक उभारताना या जागेला सीआरझेडमधून वगळले जावे अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात आल्याची माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली. हे स्मारक नक्कीच भव्य असेल असेही त्यांनी सांगितले. या स्मारकाच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याने आता त्याचा कामालाही गती येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment