वेगळया तेलंगणाला शिवसेनेचा विरोध

मुंबई, – कॉग्रेसने वेगळया तेलंगणाची निमिर्ती करण्यांचा निर्णय घेवून आंध्रच्या जनतेत उभी फूट पाडली आहे. आंध्रच्या या दोन तुकड्यांमुळे तिथली जनता एकमेकांविरोधात उभी राहिली आहे. देशात तोडफोडीचे राजकारण करून सत्ता भोगणार्याय कॉंग्रेसला उखडून फेका, असे घणाघाती आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करीत शिवसेनेचा वेगळया तेलंगणाला विरोध असल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आंध्रच्या विभाजनावरून तेथील जनतेत प्रचंड उद्रेक असतानाच कॉंग्रेसने विभाजनाचे विधेयक संसदेत मांडण्याची तयारी आता सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आंध्रच्या विभाजनावरून कॉंग्रेसने सुरू केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर उभय नेत्यांत प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

कॉंग्रेस पूर्वीपासूनच राजकारण करीत असून त्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. यापुढेही तो असेल असे सांगतानाच आंध्रच्या विभाजनालाही ठाम विरोध असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

आगामी काळात संसदेत आंध्रच्या विभाजनाचे विधेयक मांडल्यास शिवसेनेचे खासदार त्याला कडाडून विरोध करतील असे वचन त्यांनी चंद्राबाबू नायडू यांना दिले. यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई आदी उपस्थित होते. आंध्र विभाजना दरम्यान कॉंग्रेस जाणूनबुजून दोन दगडांवर पाय ठेवत आहे. एकीकडे तेलंगणावाद्यांच्या पाठीशी असल्याचे सांगायचे, तर दुसरीकडे आंध्रचे विभाजन झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायचा. दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याची कॉंग्रेसची ही खेळी आसल्याेचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Comment