टोलवसुलीच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंद

कोल्हापूर – जमावाकडून टोल नाक्‍यांची तोडफोड आणि पेटवापेटवी झाल्यानंतर 23 दिवस बंद पडलेली टोलवसुली आयआरबी कंपनीने आजपासून पुन्हा सुरू केल्याने कोल्हापुरात जनक्षोभ उसळला. कामगार मंत्री हसन मुश्रीफ व गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यापेक्षा आयआरबीचेच मंत्रालयात वजन असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. सकाळी टोल नाक्‍यावर बंदोबस्तात टोलवसुली सुरू झाल्याची बातमी शहरभर पसरताच संतापाची लाट उसळली. नगरसेवकांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत महापौरांसह सर्व नगरसेवकांनी पक्षाच्या अध्यक्षांकडे सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेऊन शिरोली टोल नाक्‍यावर धडक मारली.

या वेळी पोलिस आणि नगरसेवक यांच्यात झटापट झाली. या झटापटीत महापौर सुनीता राऊत यांच्यावरही पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी महापौरांना झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे कामकाज उद्या (ता. 6) बंद राहणार आहे; तर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीनेही महापौरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी “कोल्हापूर बंद’ची हाक दिली आहे. टोल नाक्‍यावर ठिय्या मारलेल्या महापौर सुनीता राऊत यांच्यासह सर्व नगरसेवकांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलनादरम्यान वीस मिनीटे टोल वसुली बंद पाडण्यात आली.

टोलविरोधात आंदोलनाने शहरात टोक गाठले होते. 6 जानेवारीपासून सहा उपोषणकर्त्यांनी महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. सहा दिवस हे उपोषण सुरू होते. तरीही शासनाने याची दखल घेतली नसल्याने ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी 11 जानेवारीला आपणही बेमुदत उपोषण सुरू करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सरकारी यंत्रणा हडबडली. चार तासांत जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी आयआरबीचे पैसे महापालिका भागवेल, असे आंदोलनकर्त्यांसमोर सांगून हा टोल पंचगंगेत बुडवू, अशी घोषणा केली. त्यानंतर बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले. दोन्ही मंत्र्यांनी तशी पत्रे रस्ते महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिली. तरीही आयआरबी कंपनीने टोलवसुली सुरूच ठेवल्याने 12 जानेवारीस जनक्षोभ उसळला. संतप्त जमावाने टोल नाक्‍याची जाळपोळ केली. नाके उद्‌ध्वस्त केले.

यानंतर तब्बल 23 दिवस टोलवसुली बंद होती. या काळात शासकीय पातळीवर चर्चाचे गुऱ्हाळ सुरूच होते. पण ठोस निर्णय झाला नाही. न्यायालयाच्या सुनावणीतही कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे आयआरबी कंपनीने पुन्हा आजपासून टोलवसुली सुरू करत असल्याचे महापालिकेला कळविले होते. आज सकाळी सातपासून टोल नाक्‍यावर पुन्हा तयारी सुरू झाली. शिरोली नाक्‍यावर पुन्हा नवीन टोल केबिन टाकण्यात आली. कर्मचारी सात वाजल्यापासून टोल नाक्‍यावर उपस्थित होते. सकाळी पावणेदहा वाजता शाहू जकात नाका, शिरोली जकात नाका, उचगाव जकात नाका, शिये जकात नाका आदींसह सर्वच टोल नाक्‍यावर वसुलीला सुरवात झाली. टोल पुन्हा सुरू झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली. अकरा वाजण्याच्या सुमारास टोलविरोधी कृती समितीचे बाबा पार्टे, जयकुमार शिंदे शिरोली टोल नाक्‍यावर आले. याठिकाणी जयकुमार शिंदे वाहनधारकांना टोल देऊ नका, असे आवाहन करत होते. त्यावेळी पोलिस अधिकारी आणि शिंदे यांच्यात बाचाबाची झाली. कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील या दोन्ही मंत्र्यांनी टोल पंचगंगेत बुडवू अशी घोषणा केल्यानंतरही आयआरबी कंपनीने पुन्हा टोलवसुली सुरू केल्याने महापालिकेच्या सत्तारूढ आघाडीत एकच खळबळ माजली. महापौर सुनीता राऊत यांनी महापालिकेत सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक बोलविली. या बैठकीत टोल रद्द झाला नाही तर प्रसंगी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी पदाधिकारी, नगरसेवकांनी दर्शविली. पदांचे राजीनामे पक्षाध्यक्षांकडे देण्याचा निर्णय झाला.

Leave a Comment