ऑक्सिजन थेरपीने जखमांवर उपचार

काही वेळा काही मधुमेहींना जखम होते आणि ती भरून निघत नाही. त्यामुळे त्या जखमेसहीत त्याला जगावे लागते किंवा जखम बरी होण्यासाठी आधी शुगर नियंत्रणात आणून मग उपचार करावे लागतात. त्याला खूप दिवस लागतात. काही वेळा काही रुग्णांच्या शरीरामध्ये रक्तप्रवाह अवरुद्ध होतो. शरीराच्या एका विशिष्ट अवयवापर्यंत रक्त जाऊन पोचतच नाही. मग तो अवयव निकामी व्हायला लागतो. कधी कधी तर तो अवयव कापून काढावा लागतो. कारण काही रुग्णांच्या बाबतीत तिथे गँगरिन होते आणि ते शरीरभर पसरण्याचा धोका असतो. मात्र आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यावर एक नवीन उपाय शोधून काढण्यात आला आहे. तो उपाय म्हणजे ऑक्सिजन थेरपी.

सध्या पुण्यामध्ये तीन मोठ्या रुग्णालयात ही ऑक्सिजन थेरपी वापरली जात असून तिच्यामुळे एरवी लवकर भरून न येणार्‍या जखमा लवकर भरून येत आहेत आणि प्राणवायूचा पुरवठा न झाल्या मुळे निकामी होऊ पाहणारे अवयव त्यांना प्राणवायू मिळाल्यामुळे काम करायला लागले आहेत. जखमा भरून न येणारे रुग्ण, भाजलेले रुग्ण, धक्क्यामुळे मेंदूला इजा झालेले रुग्ण किंवा विविध प्रकारच्या किरणोत्सर्जनामुळे त्वचेत दोष निर्माण झालेले रुग्ण यांना ही ऑक्सिजन थेरपी म्हणजे वरदान ठरत आहे. या थेरपीच्या उपचारांमध्ये रुग्णाला एका विशिष्ट प्रकारच्या चेंबरमध्ये झोपवले जाते. तिथे त्याला १०० टक्के ऑक्सिजनमध्ये श्‍वास घेता येतो. मात्र हा ऑक्सिजन एरवीच्या पद्धतीने दिला जात नाही.

सर्वसामान्यपणे शरीरामध्ये श्‍वसनातून ज्या दाबाने ऑक्सिजन ँशरीरात जात असतो त्याच्या दीड ते तीनपट अधिक दाबाने दिला जातो. अधिक दाबाने ऑक्सिजन शरीरात गेल्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा जादा पुरवठा तर मिळतोच परंतु जास्त दाबाने दिल्यामुळे तो रक्तातल्या प्लाझमा या घटकात विरघळतो आणि त्याच्या माध्यमातून तो त्या विशिष्ट अवयवा पर्यंत पोचतो. या थेरपीमध्ये असे आढळले आहे की, या पद्धतीने प्राणवायू दिल्यास तो सामान्य श्‍वसनातून मिळणार्‍या प्राणवायूपेक्षा १़० ते २० पट अधिक प्रमाणात मिळतो आणि तो सगळ्याच अवयवांच्या किंवा संस्थांच्या शेवटच्या पेशींपर्यंत जाऊन पोचतो. परिणामी प्राणवायू न मिळाल्यामुळे निकामी होऊ पाहणारे अवयव सजग होतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment