शिर्डीचे सेना खासदार वाकचौरे कॉग्रेसच्या वाटेवर?

शिर्डी : आगामी काळात होत असलेल्यास लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वयभूमीवर शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांचे बोट धरुन वाकचौरे काँग्रेसमध्ये डेरेदाखल होत असल्याची चर्चा आहे. ही बातमी मात्र खासदार वाकचौरे यांनी फेटाळून लावली आहे.

शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी यासंदर्भात त्यांनी दिल्ली दरबारी हजेरी लावल्याची बातमी दिवसभर चर्चेत होती. मंगळवारी दुपारी वृत्तवाहिन्यांनी वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे दाखवून खळबळ उडवून
दिली. सायंकाळी मात्र वाकचौरे यांनी फेसबुकवर ‘आपण काँग्रेसलाही हवे आहोत व शिवसेनेलाही. मात्र आपण शिवसेनेचे होतो व कायम राहून शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार करणार आहोत. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये’ अशी पोस्ट टाकून उठलेल्या वावड्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

यांसदर्भात बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनीही खासदार वाकचौरे आपल्या संपर्कात असून ते सोनिया गांधी व मुख्यमंत्र्यांना अंगणवाडी सेविकांच्या विषयासंदर्भात भेटल्याचे सांगितले. देशात काँग्रेस विरोधी लाट असतांना तसेच काँग्रेसचे अनेक नेते युतीच्या संपर्कात असतांना वाकचौरे काँग्रेसच्या बुडत्या जहाजात
बसणार नाहीत. ते आमच्या बरोबरच आहेत व सेनेचेच उमेदवार राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment