वाजपेयी, ठाकरेंच्या पंगतीत आंबेडकरांना बसवू नका! – आठवले

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ही मोठी माणसे आहेत. पण त्यांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी कदापिही होऊ शकत नाही. त्यामुळे महायुतीच्या मेळाव्यात यापुढे ऐ-यागै-याच्या शेजारी बाबासाहेबांची प्रतिमा लावल्यास आंबेडकरी जनता खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशारा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी दिला.

ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते प्रा. अर्जुन डांगळे यांच्या ‘आंबेडकरी चळवळीचा नवा अजेंडा’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कॉंग्रेसचे रत्नाकर महाजन, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे विनय सहस्रबुद्धे, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, पत्रकार अनंत दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती. इचलकरंजी येथील महायुतीच्या मेळाव्यात अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे समान आकारात लावण्यात आली होती. बाबासाहेबांची अशी तुलना झाल्याबद्दल आंबेडकरी कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. \

‘संघाने अस्पृश्यतेच्या विरोधात कायम भूमिका घेतली होती. शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग आजचा नसून त्याची खरी रुजुवात १९७० च्या दशकात जनसंघाने केली होती,’ असा दावा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या विनय सहस्रबुद्धे यांनी केला. ‘आपल्या देशात लोकशाहीचा अतिरेक असल्यामुळे राजकीय पक्ष फुटतात,’ असा आरोप करत जातिव्यवस्था संपवण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा ‘रिपाइं’ने मराठीचा झेंडा खांद्यावर घेत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करावे,’ असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

‘चार-दोघांच्या आमदार, खासदारकीसाठी धर्मवादी शिवसेना-भाजपबरोबर नको त्या तडजोडी करण्याच्या भानगडीत पडणे टाळावे. किमान डॉ. आंबेडकर यांना तरी हिंदुत्ववाद्यांच्या दावणीला बांधू नका, असा इशारा कॉंग्रेसचे रत्नाकर महाजन यांनी रिपाइंला दिला.

Leave a Comment