मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदी भारतीय वंशाचे सत्या नाडेला विराजमान

न्यूयॉर्क- जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टने ही अधिकृत घोषणा केली. मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांनी सत्या नाडेला यांचे अभिनंदन केले आहे. मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदासाठी दोन भारतीयांमध्ये कट्टर स्पर्धा होती. त्यात हैदराबादचे सत्या नाडेला आणि चेन्नईचे सुंदर पिचाई यांच्या खरी स्पर्धा झाली. याशिवाय ‘फोर्ड’चे सीईओ अ‍ॅलन मूलॅली यांचेही नाव चर्चेत होते. स्टीव्ह बाल्मर यांचे उत्तराधिकारी म्हणून नाडेला यांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या 38 व्या वर्षांच्या वैभवशाली इतिहासातील सीईओपदाचा कार्यभार सांभाळणारे नाडेला तिसरेच सीईओ आहेत.

नाडेला गेली 22 वर्षांपासून मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे कंपनीने बाहेरील व्यक्तीला संधी देऊन धोका पत्करण्याऐवजी नाडेला यांना संधी दिल्याचे सुत्रांनी सांगितले. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर आणि टूल्स विभागात क्रांतीकारी बदल करुन संगणक वापरण्यास सोपा करण्यात सत्या यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. यामुळे मायक्रोसॉफ्टच्या व्यवसायातही प्रचंड वाढ झाली. मायक्रोसॉफ्टच्या अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. ह्यबिंगह्ण या सर्च इंजिनला मिळालेल्या माफक यशातही त्यांचा मोठा वाटा आहे. मायक्रोसॉफ्टच्या अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय अशा डाटाबेस, विंडोज सर्व्हर आणि अझ्यूर सारख्या क्लाऊड सर्व्हिससाठी विकसीत केलेल्या डेव्हलपर टूल्सच्या यशात नाडेला यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड व्हर्जनसाठीचे सर्वोत्कृष्ट उत्पादन मायक्रोसॉफ्ट ऑफिस, जे ऑफिस 365 नावाने ओळखले जाते, ते नाडेला यांच्या मार्गदर्शनाखालीच क्लाऊड सर्व्हिससाठी उपलब्ध करुन देण्यात आले. सत्या नाडेला(47) यांचा जन्म हैदराबाद येथे 1967 साली झाला. हैदराबादमधील बेगमपेठ भागातील हैदराबाद पब्लिक स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मनिपाल विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. नाडेला यांनी विस्कॉनसीन विद्यापीठातून मास्टर्स ऑफ सायन्स (कॉम्प्युटर सायन्स)चे शिक्षण पूर्ण केले. सत्या यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथून एमबीए पूर्ण केले. नाडेला यांनी यापूर्वी ऑनलाई सर्व्हिसेस डिव्हिजनच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष (सिनियर व्हाईस प्रेसिडेंट) म्हणून, तसेच मायक्रोसॉफ्टच्या बिझनेस डिव्हिजनचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

Leave a Comment