मनसेच्या सभेला पुण्यात जागाच मिळेना !

पुणे – राज्यभरात ‘टोल’फोडीचे सुत्रधार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात जाहीर सभा घेणार असे जाहीर केले पण राज यांच्या या सभेसाठी जागाच मिळत नसल्यामुळे मनसेची पंचाईत झाली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने पुण्यात ९ फेब्रुवारीला जाहीर सभा घेण्यात येणार आहे. पुण्यातील अल्का टॉकीज परिसरात सभा घेण्याची परवानगी मनसेने पोलीस विभागाला मागितली आहे. पण मनसेच्या या सभेला पोलीस विभागाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सभा घ्यायची कुठे असा प्रश्न मनसे पदाधिकार्‍यांपुढे पडला आहे.

परवानगी मिळाली नाहीतर कोणत्याही परिस्थितीत अगदी रस्त्यावरही सभा घेऊ, असा निश्चय मनसेच्या नेत्यांनी केला आहे. टोल फोड प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार गुन्हे दाखल करण्यात आले मात्र राज यांच्यावर कारवाई करण्याबाबत अजूनही सरकारने भूमिका घेतली नाही.

रविवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात टोल नाक्याबाबत ९ फेब्रुवारीच्या सभेतच भूमिका मांडणार असल्याचे राज यांनी जाहीर केले. त्यामुळे राज काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना आहे. पण पुणे पोलिसांनी सभेला परवानगी नाकारल्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment