भारतात आर्थिक विषमतेत वाढ

वॉशिंग्टन – गेल्या १५ वर्षात भारतातील अब्जाधिशांची संख्या बारा पटीने वाढले आहे. त्यांची संपत्तीही प्रचंड वाढली आहे. परंतु पैशाचे केंद्रीकरण त्याच लोकांत होत असल्यामुळे बाकीचा समाज आहे तिथेच आहे. या अब्जाधीशांची एकूण संपत्ती देशात समानतेने वितरित झाली असती तर भारताचे दारिद्य्र दोन वेळा संपले असते. परंतु आर्थिक विषमतेमुळे ते शक्य झालेले नाही, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

गेल्या ३० वर्षात जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये हे दृश्य दिसत आहे. समृद्धी वाढत आहे, पण तिचा लाभ गरिबांना होत नाही. त्यामुळे जगाच्या पाठीवरील दहा पैकी सात माणसे आर्थिकदृष्ट्या विषम अवस्थेत जगत आहेत, असे नाणेनिधीच्या संचालिका ख्रिस्तीन लिगार्ड यांनी म्हटले आहे. त्या लंडनमध्ये झालेल्या एका व्याख्यानात बोलत होत्या.

आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेत जगणार्‍यांची संख्या मोठी आहे. या गरीब लोकांच्या एकूण संपत्तीच्या ५० टक्के एवढी संपत्ती जगातल्या केवळ ८५ अती श्रीमंतांच्या मालकीची आहे. अमेरिकेत सुद्धा संपत्तीच्या केंद्रीकरणाचे दृश्य असेच आहे. २००९ साली केलेल्या एका पाहणीमध्ये असे आढळले होते की, अमेरिकीची ९५ टक्के संपत्ती केवळ १ टक्का लोकांच्या मालकीची आहे आणि देशातले ९० टक्के लोक दारिद्य्रात जगत आहेत. येत्या ३० वर्षात संपत्तीच्या केंद्रीकरणाचे हे स्वरूप अधिक गंभीर रूप धारण करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.