दहावी-बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे

मुंबई- दहावी-बारावीच्या परीक्षेवर मुख्याध्यापक- शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळेवर होतील. यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ व कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीने दहावी-बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.

मुख्याध्यापक संघ महामंडळ, विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षकेतर समन्वय समितीच्या मुख्य पदाधिका-यांनी बालभवन मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण आंदोलन मागे घ्यावे राज्यातील कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील ह्यकायमह्ण हा शब्द मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्काळ काढण्यात येणार असून त्यासाठीची कार्यवाही आपल्याकडून पूर्ण झाली असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले.

यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्यात येत असल्याची माहिती मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज, सचिव अरूण थोरात, सुभाष माने यांनी दिली. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्र्यांसमोर दिलेल्या निवेदनात विविध प्रकारच्या १६ मागण्या सादर केल्या होत्या. त्यापैकी शालेय पोषण आहारासाठी मुख्याध्यापक संघ तसेच शिक्षण संचालक कार्यालयाने तयार केलेला मसुदा स्वीकारणे, यासाठीची मुख्य जबाबदारी मुख्याध्यापकावर व पोषण आहार निर्मिती व वाटपाची जबाबदारी बचत गटांवर देण्याच्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. तर मुल्यांकनास प्राप्त झालेल्या विनाअनुदानित शाळांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला असून त्याला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची ग्वाहीही यावेळी शिक्षण मंत्र्यांनी दिली असल्याचे रेडीज यांनी सांगितले.

Leave a Comment