चीनमध्ये वाढली गांधीजींची लोकप्रियता

शांघाय – महात्मा गांधींजींच्या अहिंसेच्या धोरणावर काहींचा विश्वास नसला तरी हे पुस्तक वाचल्यानंतर गांधींजींच्या आंतरिक सामर्थ्यांची आणि त्यांच्या ध्येयासक्तीची त्यांनाही प्रचिती येते. सध्या ही प्रचिती चीनमधील नागरिकांना येत आहे आणि त्यामुळेच इतक्या वर्षानी गांधीजींची लोकप्रियता आता चीनमध्ये वाढू लागली आहे.

गांधीजींच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकाचे सुमारे ३५ भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. आता या पुस्तकाचे भाषांतर चीनमधील मंदारिन भाषेत केले जाणार आहे. चीनमध्ये गांधीजींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या पुस्तकाचे भाषांतर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे चीनमधील काही विचारवंतांनी सांगितले आहे. गांधीजींच्या निवडक साहित्याचे पाच खंडही चीनमध्ये स्थानिक भाषेत उपलब्ध केले जाणार आहेत.

चीनमधील ब-याच लोकांमध्ये विशेषत: तरुणांमध्ये गांधीजींच्या कार्याबाबत उत्सुकता आहे. मात्र, त्यांच्या विषयी स्थानिक भाषेमध्ये कोणतेही साहित्य किंवा माहिती उपलब्ध नाही, असे सन्यत सेन विद्यापीठाचे प्राध्यापक हुआंग यिंगहॉंग यांनी सांगितले. त्यामुळेच स्थानिक भाषेत गांधीजींची माहिती उपलब्ध करून देणारे साहित्य चीनमध्ये आणण्याचा आपण निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

प्राध्यापक हुआंग या विद्यापीठात गांधीजींच्या साहित्याबद्दल संशोधन करत आहेत. गांधीजींची असहकार चळवळ आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांविरोधात लोकांना एकत्र आणण्याची क्षमता यांमुळे चिनी राज्यकर्त्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. १९५० पर्यंत गांधीजींची २७ पुस्तके आणि अनेक लेख चीनमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी चीनमध्ये ते भारताचे ‘रुसो’ व ‘टॉलस्टॉय’ म्हणून प्रसिद्ध होते. मात्र, चीनमध्ये कम्युनिझमचा उदय झाल्यावर गांधीजींच्या साहित्याबाबतची रुची कमी झाली. माओवादी विचारसरणी आणि चीनमधील राजकीय वातावरणात गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वांना आणि समतेच्या पुरस्काराला स्थान नव्हते.

माओच्या आधीच्या काळातील चिनी विचारवंत गांधीजींना भेटले होते व त्यांच्या समस्यांचा अंत करण्यासाठी ते गांधीजींच्या तत्त्वाचे पालन करू लागले होते, अशी माहिती माजी भारतीय राजदूत आणि गांधी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक पास्कल ऍलन नाझरेथ यांनी दिली. जरी गांधीजींनी कधीही चीनला भेट दिली नसली तरी त्यांच्या अहिंसेच्या चळवळीने चीनमधील अनेकांना प्रेरणा दिली होती.

दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनी सुरू केलेल्या चळवळीमध्ये तब्बल १००० चिनी नागरिकांनी भाग घेतला होता. या सर्वाना अटक झाल्यावर त्यांच्या सोबत गांधीजींनी आपल्या विचारांची देवाणघेवाण केली. भारतीय इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी ही आठवण त्यांच्या पुस्तकात लिहिली आहे. हा कालखंड उलटून गेल्यानंतर अनेक दशकांनी २००० मध्ये नोबेल पारितोषिक विजेते लिऊ झियाबाओ यांनी गांधीजींचे वर्णन देशाचे नीतीधैर्य उंचावणारा आणि जनतेमधील एकतेचे बंध दृढ करणारा एकमेव हुतात्मा असे केले होते.

चीनमधील आर्थिक सुधारणांनंतर पुन्हा एकदा गांधीजींबद्दल चीनमध्ये उत्सुकता निर्माण झाली. १९८०पासून आतापर्यंत चीनमध्ये गांधीजींविषयीची ५०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गांधीजींच्या शिकवणीमुळे चीनमधील लोक त्यांच्या समस्या व्यक्त करण्याचे आणखी चांगले मार्ग शोधू शकतील, असे हुआंग यांना वाटत आहे.