कोल्हापुरात पुन्हा पोलीस बंदोबस्तात टोल वसुली सुरू

कोल्हापूर – तोडफोड व जाळपोळ झाल्याने बंद झालेले कोल्हापुरातील टोल नाके आज (बुधवार) सकाळी नऊ वाजता पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे पुन्हा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हापुरातील शिरोली, शाहू, ऊसगाव, फुलेवाडी, आरके नगर या नाक्यांवर पोलिस बंदोबस्तात टोलवसुली सूरू केली आहे.

कोल्हापूरचे पासिंग असलेल्या गाड्यांना सोडण्यात येत असले तरी, बाहेरील गाड्यांकडून टोल वसुली करण्यात येत आहे. जळालेल्या अवस्थेत असलेल्या टोलनाक्यांवर ही वसुली करण्यात येत आहे. टोल वसुलीचे कंत्राट असलेल्या आयआरबी कंपनीने पोलिस सुरक्षा पुरविण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी पत्र दिले होते. त्यानुसार पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे.

कोल्हापुरात आयआरबीने अंतर्गत रस्त्यांचा विकास केल्यानंतर याठिकाणी टोल विरोधी आंदोलन सुरू झाले होते. तब्बल तीन वर्षे सुरू असलेल्या या आंदोलनात कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टोल वसुली करण्यास विरोध दर्शविल्यानंतरही याठिकाणी टोल वसुली सूरू आहे.

कोल्हापूर रस्ते प्रकल्पांचे फेरमूल्यांकन करण्यात यावे. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ, कोल्हापूर महापालिका, आयआरबी कंपनी आणि टोल विरोधी कृती समिती यांच्या प्रतिनिधींची फेरमूल्यांकन’ समिती नेमण्यात यावी. कोल्हापूर महापालिकेच्या ताब्यातील दोन-तीन भूखंड आयआरबीला देण्यात यावेत, शहरातील अंतर्गत रस्ते नगरोत्थान योजनेतून केल्याचे दाखवून केंद्राकडून निधी मिळवायचा, प्रत्येक वर्षी २५ते ३० कोटींचा निधी डीपीडीसीतून उपलब्ध करायचा, आणि वेळ पडलीच तर महापालिकेकडून कर्जाची उभारणी करून आयआरबीचा प्रश्‍न मिटवायचा असे पर्याय कोल्हापूरातील लोकप्रतिनिधी, महापालिका आणि कृती समितीकडून सरकारसमोर ठेवले आहेत

Leave a Comment