आमदार विनोद घोसाळकर यांच्या अडचणीत वाढ

मुंबई – आमदार विनोद घोसाळकर यांनी शिवसेनेच्या नगरसेविकेचा मानसिक छळ केल्याच्या गुन्ह्याचा तपास आता गुन्हे शाखेच्या महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा करणार आहे. हे प्रकरण या शाखेकडे वर्ग केल्याने शिवसेनेचे आमदार घोसाळकर यांच्याक समोरील अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे शिवसेना हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी हे प्रकरण ताणण्याचा प्रयत्न केल्यामुळे घोसाळकर चांगलेच अडचणीत आले आहेत.

गेल्या वर्षीच महिलांविरोधातील गुन्हे अधिक संवेदनशीलपणे हाताळण्यासाठी महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेची स्थापना झाली होती. घोसाळकर पिता-पुत्राकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेविकांनी केला. यानंतर दहिसर पोलिस ठाण्यात घोसाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. या संवेदनशील प्रकरणाचा तपास योग्य रितीने होण्यासाठी ते आमच्याकडे वर्ग केल्याचे या शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त कला गावित यांनी सांगितले. या प्रकरणी पीडित नगरसेविकांना या शाखेने पत्र पाठवले आहे.

यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेविकेशी चर्चा करून घोसाळकर यांच्याबाबत असलेल्या गैरसमज आणि सुरू असलेल्या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तीनच दिवसांत मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेअंतर्गत येणा-या महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेकडे वर्ग केले. त्यामुळे आमदार घोसाळकर अडचणीत सापडले आहेत.

Leave a Comment