अशक्य ते शक्य झाले

जगातील अग्रगण्य संगणक कंपनी मायक्रोसॉफ्ट ही आता एका भारतीयाच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणार आहे. त्या भारतीयाचे नाव आहे सत्य नाडेला. सत्य नाडेला यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या कर्मचार्‍यांना एक संदेश पाठवला असून तो संदेश केवळ त्यांच्या कर्मचार्‍यांनीच नव्हे तर सार्‍या भारतीयांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. ऑस्कर वाईल्ड या लेखकाचे एक वाक्य त्यांनी आपल्या या संदेशात उद्धृत केले. जे अशक्य आहे त्यावर आपण विश्‍वास ठेवला पाहिजे आणि जगात काही असंभव आहे हे आपल्या डोक्यातून काढून टाकले पाहिजे, असा या संदेशाचा मतितार्थ आहे. सत्य नाडेला यांची ही निवड हा भारताचा एक गौरवच आहे. गेल्या पन्नास वर्षामध्ये भारताने केलेल्या शैक्षणिक आणि तांत्रिक प्रगतीची फळे अशी भारताला मिळायला लागली आहेत. मुळात भारतीय लोक जगात सर्वात बुद्धीमान आहेतच, त्यातच त्यांना आता चांगली संधी मिळायला लागली आहे. त्यामुळे जगाच्या आर्थिक भवितव्याचे चित्र रेखाटणार्‍या मुख्य बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व भारतीयांच्या हातात यायला लागले आहे. पाच वर्षांपूर्वी सार्‍या जगाला थंड पेये पाजणार्‍या पेप्सीको या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय मुळाच्या इंद्रा नुई यांची नियुक्ती झाली तेव्हा सार्‍या जगाच्या नजरा विस्फारल्या होत्या. मात्र त्याच्या पाठोपाठ अन्शु जैन यांनी डच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद पटकावले आणि त्याच्या पाठोपाठ अजय बंगा यांनी मास्टर कार्ड या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली. याशिवाय अजूनही अनेक भारतीय जगातल्या नामवंत कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी झालेले आहेत. मध्यंतरी करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये जागतिक आर्थिक उलाढालीतील ४० टक्के उलाढालीची मालकी असणार्‍या कंपन्यांचे नेतृत्व भारतीयांकडे असल्याचे लक्षात आले होते.

पेप्सीको या कंपनीची उलाढाल तर चकित करणारी आहेच, पण बिल गेटस् याला जगातला सर्वात श्रीमंत माणूस करणार्‍या मायक्रोसॉफ्ट या कंपनीचाही प्रभाव असाच आहे. आपल्या हातामध्ये संगणक नावाची वस्तू लहान लहान होऊन आलेली आहे. संगणकाच्या क्षेत्रात केवळ अमेरिका आणि भारतच नव्हे तर सार्‍या मानवतेला क्रांतीकारक बदलाकडे नेणार्‍या मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नाव सर्वांना माहीत आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाचे आणि हैदराबादमध्ये राहणारे सत्य नाडेला यांची नियुक्ती झाली आहे. जगातल्या सर्वात प्रभावशाली कंपनीचे नेतृत्व बिल गेटस् आणि स्टीव्ह बाल्मेर यांच्या नंतर एका भारतीयाकडे यावे ही गोष्ट भारतातल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावी अशी आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना होऊन ४० वर्षे झाली. पहिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बिल गेटस्ने काम केले. त्यानंतर स्टीव्ह बाल्मेर याने त्याची सूत्रे हाती घेतली. बाल्मेर याला निवृत्तीचे वेध लागल्यानंतर आता ही जबाबदारी कोण स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते आणि बरीच नावे चर्चेत होती. विशेष म्हणजे या नावांवर चर्चा होत होत शेवटी जी दोन नावे उपांत्य फेरीत राहिली होती त्यात एक नाव तर सत्य नाडेला यांचे होतेच, पण त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून शेवटच्या फेरीपर्यंत जे नाव शिल्लक होते ते एका भारतीयाचेच होते. त्याचे नाव सुंदर पिचाई.

डिसेंबरच्या अंतापर्यंत ही दोन नावे शिल्लक राहिली होती आणि तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की, या दोघांपैकी कोणाचीही निवड झाली तरी जगातल्या या बलाढ्य कंपनीचे नेतृत्व एका भारतीयाकडे राहणार. दोघापैकी सत्य नाडेला यांचे नाव पुढे आले. अशा रितीने ७८ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ४६ वर्षीय सत्य नाडेल यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. भारतीय लोक क्रिकेटवेडे आहेत असे म्हणतात. सत्य नाडेला त्याला अपवाद नाहीत. तेही क्रिकेटवेडे आहेत. मात्र ते क्रिकेटकडे केवळ एक छंद किंवा खेळ म्हणून पहात नाहीत तर सर्वांना सोबत घेऊन जाण्याची अद्वितीय नेतृत्व क्षमता आपल्याला क्रिकेटमुळेच प्राप्त झाली असल्याचे ते सांगतात. त्यांची निवड जाहीर करताना मायक्रोसॉफ्टचे चेअरमन बिल गेटस् यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची सत्य नाडेला यांची हातोटी वाखाणली आहे. नव्या गोष्टींचा वेध घेणे, अन्य कंपन्यांचे सहकार्य कौशल्याने मिळवणे आणि अद्वितीय संघटन चातुर्य या गुणांमुळे सत्य नाडेला यांचीच या पदासाठी निवड होऊ शकली, असे बिल गेटस् यांनी म्हटले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने जगाच्या तंत्रज्ञानाचे चित्र बदलले. ते तसेच बदलत ठेवण्याचे कसब सत्य नाडेला यांच्यात आहे, असे प्रशंसोद्गार बिल गेटस् यांनी काढले.

आपले आगामी धोरण स्पष्ट करताना नाडेला यांनी आपण परंपरा मानत नाही, बदल मानतो असे अभिमानाने नमूद केले आहे. नाडेला यांच्या नियुक्तीमुळे भारतामध्ये आणि विशेषत: आंध्र प्रदेशामध्ये आनंदाची लाट उसळली असल्यास नवल नाही. ते कंपनीला आणि जगाला बदलून टाकतील, असा विश्‍वास भारतवासीयांना वाटतो. मायक्रोसॉफ्ट कंपनीने जग बदलले आहे, परंतु जग बदलण्याचा मक्ता केवळ याच कंपनीकडे आहे असे नाही. नोकिया कंपनीने सुद्धा जगात मोठे बदल केले आहेत. फक्त फरक एवढा की, मायक्रोसॉफ्टने संगणकात जेवढा बदल केला तेवढाच बदल नोकियाने मोबाईल हॅन्डसेटमध्ये केला आणि केवळ बदलच केला असे नाही तर मायक्रोसॉफ्टने लहान केलेला संगणक नोकियाने हॅन्डसेटमध्ये आणला आणि जग बदलण्याच्या मायक्रोसॉफ्टच्या मक्तेदारीला जबरदस्त आव्हान निर्माण केले. आता या आव्हानाला तोंड देऊन सत्य नाडेला यांना कंपनीची मक्तेदारी टिकवायची आहे आणि जगाला बदलायचे आहे.

Leave a Comment