सीरिया हवाई हल्ला, १८ नागरिकांचा मृत्यू

ऍलिपो – सीरियन सरकारने बंडखोरांच्या ताब्यातील ऍलिपो शहरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या हवाई हल्ल्‌यात १८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. ऍलिपो शहरावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी सिरीयन वायू दलाने हवाई हल्ले अधिक तीव्र केले आहेत. यामध्ये निरपराध नागरिक मारले जात आहेत.

राष्ट्राध्यक्ष बाशर आसाद यांच्या इशा-यावरुन सीरियामध्ये खूनी रक्तपात सुरु आहे. बंडखोरांनी नियंत्रण मिळवलेले प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सीरियन लष्कराचे जोरदार हल्ले सुरु आहेत. या निष्पाप नागरिक, लहान मुले मारली जात आहेत. सीरियामधील रुग्णालये जखमी रुग्णांनी भरुन गेली आहेत. रविवारी सीरियन हवाई दलाने ऍलिपोच्या पूर्व भागावर केलेल्या बॉम्बफेकीत ४० नागरिकांचा मृत्यू झाला. जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्यासाठी बॉम्बमध्ये धातू आणि इंधनाचा वापर करण्यात येत आहे असे युध्दवर लक्ष ठेऊन असलेल्या मानवधिकार कार्यकर्त्यांनी सांगितले. सीरियन हवाई दलाच्या विमानांनी सोमवारी हनानो, कादी अस्कर आणि मोयू वासाल्ट या भागांवर बॉम्बफेक केली.