सीएनजी प्रति किलो १५ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली- सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी देशातील गॅस प्रकल्पातील गॅसचा पुरवठा सीएनजी कंपन्यांना पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सीएनजीच्या भावात किलोमागे १५ रुपये तर पाइप गॅसच्या भावात पाच रुपयांनी घट होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी केली. सध्या शहरातील घरगुती व वाहनांसाठी सध्या देशातील गॅस प्रकल्पातून निर्माण होणारा ८० टक्के गॅसचा पुरवठा केला जातो.

आता या क्षेत्रासाठी १०० टक्के गॅस पुरवठा केला जाईल. या निर्णयाचा फायदा दिल्ली व अहमदाबादसारख्या शहरातील नागरिकांना मिळू शकेल. मात्र, पेट्रोकेमिकल्स, पोलाद आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांना लागणा-या गॅसच्या पुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे. सध्या सीएनजी तयार करण्यासाठी महागडा एलएनजी गॅस वापरला जातो. देशाअंतर्गत गॅसचा पुरवठा केल्याने आपोआपच गॅसच्या किंमती कमी होऊ शकतील. सर्वसामान्य व्यक्तींना दिलासा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असेही मोईली म्हणाले. देशाअंतर्गत गॅस प्रकल्पातून मुंबईला गॅसचा पुरवठा केला जात असल्याने तेथील भाव कमी होणार नाहीत. दिल्ली व अहमदाबादमध्ये सीएनजीसाठी महागडा एलएनजी वायू वापरला जातो. तेथे या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Leave a Comment