वड्याचे तेल वांग्यावर

आम आदमी पार्टीचे सरकार स्वतःच्या वर्तनाने विश्‍वासार्हता गमावत आहे आणि ते सरकार पडावे म्हणून कॉंग्रेसचे नेते केवळ डावपेचच आखत आहेत असे नाही तर उघड उघड धमक्या देत आहेत. अशा वेळी सरकार टिकवायचे असेल तर आपल्या पक्षात शिस्त वाढवली पाहिजे किंवा कॉंग्रेसचे नेते आपल्या सरकारला कसा धक्का लावणार नाहीत याचा विचार केला पाहिजे. पण त्याऐवजी आम आदमीच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीलाच लक्ष्य करायला सुरूवात केली आहे आणि भाजपाचे नेते आपले सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असा आरोप करायला सुरूवात केली आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि निवडणूक विश्‍लेषण तज्ञ योगेंेद्र यादव यांनी दोन दिवसांपूर्वी असाच आरोप केला. भारतीय जनता पार्टी आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र त्याचा कसलाही पुरावा ते देऊ शकले नाहीत. एका तज्ञ व्यक्तीने असा आरोप करावा मात्र अशा प्रकारचे आरोप करताना त्याचा काहीतरी पुरावा सादर करावा लागतो त्याला माहीत असू नये ही आश्‍चर्याची गोष्ट आहे. जोपर्यंत अशा आरोपांचे पुरावे दिले जात नाहीत. तोपर्यंत लोकसुध्दा त्यावर विश्‍वास ठेवत नाहीत हेही त्यांना कळायला हवे होते.

पक्षाचे दिल्लीतले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशाच प्रकारे पुराव्याची चिंता न करता देशातल्या बर्‍याच बड्या नेत्यांची यादी भ्रष्ट नेते म्हणून सादर केली. ती करतानासुध्दा त्यांनी पुराव्याची चिंता केली नाही. परिणामी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचे दावे दाखल होत आहेत. त्याचीच पुनरावृत्ती योगेंद्र यादव यांनी केली. काल या पक्षाचे आमदार मदनलाल यांनी आपल्याला अरुण जेटली आणि नरेंद्र मोदी यांनी पक्षांतर करण्यासाठी २० कोटी रुपये देऊ केले असल्याचा आरोप केला. त्यांनीसुध्दा असा आरोप करताना आरोपाचे पुरावे द्यावे लागतात याचे भान पाळले नाही. आपण थेट कोणाची तरी नावे घेऊन आरोप करतो आणि पत्रकार परिषद घेऊन ती नावे जाहीर करतो याचा अर्थ ती नावे खरीच असतात आणि लोकांनी ती नावे खरीच मानावीत असा त्यांचा समज आहे. पण त्यांनी सबळ नसला तरी साधासुधा काहीतरी पुरावा द्यायला हवा होता. मात्र सात डिसेंबरच्या रात्री आपल्याला अरुण जेटलींच्या सहकार्‍याने फोन केल्याचे ते म्हणतात. २० कोटी रुपये देऊ आणि त्या बदल्यात त्यांनी आम आदमी पार्टी सोडून भाजपात प्रवेश करावा अशी ऑफर आपल्याला दिली गेली असे त्यांनी सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी नरेंद्र मोदी यांचे नाव सांगून दोघांनी आपली भेट घेतली आणि पक्षांतर करत असल्यास २० कोटी रुपये देऊ असे आमिष दाखवले हा फोनसुध्दा कोणी केला याची नावे त्यांच्याकडे नाहीत.

हे फोन कोणत्या फोन क्रमांकावरून आले. याची कसलीही नोंद त्यांच्याकडे नाही. पुरावे तर देण्याचे ते भान ते ठेवतच नाहीत. पण गौप्यस्फोट केल्याचा आव मात्र आणतात. त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास ठेवावा असे त्यांचे म्हणणे आहे. पण त्यांच्या या आरोपावरून मोदी किंवा जेटली यांच्याविरुध्द पक्षांतराला प्रोत्साहन दिल्याचा खटला दाखल करावा अशीही काही मागणी ते करत नाहीत. मग त्यांचे म्हणणे काय हेही कळत नाही. जर या लोकांनी २० कोटी रुपयांची आमिष दाखवून पक्षांतरला प्रोत्साहन दिले असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे कोणीही म्हणेल. परंतु अशी कारवाई करायचीच म्हटली तर पोलीस, न्यायालय, सीबीआय असे कोणीतरी पुढे आले पाहिजे आणि तसे ते आल्यास कारवाईसाठी पुराव्या द्यावा लागेल. पण तो त्यांच्याकडे नाही. त्यामुळे हा सारा प्रयास म्हणजे राजकीय धुळवड आहे हे उघड होते. २००८ साली छत्तीसगढ मध्ये कॉंग्रेसचे नेते अजित जोगी यांनी भाजपच्या आमदाराला असेच पक्षांतरासाठी पैशाची लालूच दाखवली होती आणि त्यांच्या या उपद्व्यापाचा गौप्यस्फोट अरुण जेटली यांनीच केला होता. पण त्यासाठी जेटली यांनी अजित जोगी यांनी केलेल्या फोनवरचा संवाद ध्वनिमुद्रित केला आणि तो सादर केला होता आणि तो पत्रकारांसमोर सादर केला होता. अशा प्रकारचा पुरावा देण्याचे सौजन्य दिल्लीतले आम आदमी पार्टीचे नेते दाखवत नाहीत.

अशा आरोपांमागे राजकीय कारण असते आणि त्याचे पुरावे सादर करण्याची गरज नसते अशी काही आपच्या नेत्यांची भावना असेल आणि ती वादासाठी गृहित धरली तरी कायद्याच्या भाषेत काही गोष्टी पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जात असतात. ती गोष्ट म्हणजे मदनलाल सारख्या आमदाराला भाजपच्या नेत्यांनी असे आमिष दाखवले असण्याची शक्यता आहे की नाही? तशी शक्यता असेल र आरोपावर विश्‍वास ठेवता येतो. परंतु तशी शक्यताही नाही कारण मदनलाल यांच्यामते हे आमिष दाखवणारे फोन सात डिसेंबरला आले आहेत. सात डिसेंबरला तर विधानसभा निवडणुकीचे निकालही लागले नव्हते आणि कोण कोणाच्या पाठिंब्याने सरकार बनवणार याचे कसले संकेतसुध्दा मिळाले नव्हते. तेव्हा अशा वातावरणात भाजपाने एखाद्या आम आदमीच्या आमदाराला आमिष दाखवले असण्याची शक्यता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एखादा आमदार फुटला म्हणून कोणते सरकार पडत नसते. कारण आता कायदा आलेला आहे आणि एखाद्या आमदाराच्या पक्षांतराने सरकारे पडण्याचे दिवससुध्दा मागे पडले आहेत. तेव्हा भाजपाला या एका आमदाराच्या पक्षांतराची गरजही नव्हती म्हणजे आम आदमी पार्टीच्या या नेत्यांचे आरोप हा सरळ सरळ वावदूकपणा आहे.

Leave a Comment