रशियात शाळकरी विद्यार्थ्याचा अंदाधूंद गोळीबार; शिक्षकासह पोलिस कर्मचारी ठार

मास्को- रशियाची राजधानी असलेल्या मास्कोमधील एका शाळेत विद्यार्थ्याने आज (सोमवारी) अचानक गोळीबार केला. एवढेच नाही तर 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एका वर्गखोलीत बेठीस ठेवले. त्याने केलेल्या अंदाधूद गोळीबारात शाळेच्या शिक्षकासह एका पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यु झाला आहे.

मास्कोमध्ये चार दिवसांनी सोची ओलिंपिक स्पर्धेला सुरुवात होणार असताना या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. गृह मंत्रालयाचे प्रवक्‍ता अंद्रेई पीलिपचुक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्कोमधील शाळेतील एका वर्गात विज्ञान विषयाची तासिका सुरु होती. एक विद्यार्थी बेछूट गोळीबार करत अचानक वर्गात शिरला. नंतर बंदुकीचा धाक दाखवून त्याने वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांना डांबून ठेवले. विद्यार्थ्यांच्या बचावासाठी धावून आलेल्या शिक्षकावर त्याने गोळ्या घातल्या. त्यात त्यांचा मृत्यु झाला.

तसेच गोळीबारात एक पोलिस कर्मचारीही गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. या शाळेची विद्यार्थीसंख्या 263 इतकी आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. त्याने गोळीबार करण्यामागील कारण समजू शकले नाही. पोलिसांनी शाळेला सिल करून चौकशी सुरु केली आहे.

Leave a Comment