बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार

पुणे : आगामी काळात होत असलेल्या बारावी परीक्षेच्याा कामावर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांत संभ्रमाचे वातावरण आहे. या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी शासन स्तरावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बारावीची परीक्षा वेळापत्रकानुसारच होईल, असे आश्वासन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिले आहे.

गुरुवार पासून राज्यभरात बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने विविध मागण्यांसाठी या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा नियोजित वेळेत होतील की, पुढे ढकलल्या जातील, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

प्रलंबित मागण्या मान्य झाल्याचा शासन आदेश काढल्याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयाचे राज्यभरातील सुमारे ६० हजार शिक्षक बारावीच्या परीक्षेचे कामकाज करणार नाहीत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र वाटणे, प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे वेळापत्रक तयार करणे, या कामांनाही शिक्षक हात लावणार नाहीत, असे शिक्षक महासंघाचे सरचिटणीस अनिल देशमुख यांनी सांगितले.

फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये घेतल्या जात असलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १३ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत. बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा ६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे पाठवली आहेत. पुणे विभागातील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शुक्रवारी पाठवण्यात आली असून, मुंबई विभागाच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे येत्या सोमवारी पाठवली जाणार आहेत.

Leave a Comment