तर बाळासाहेबांना जिवंतपणी सोडून गेले नसते’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एवढी काळजी असती तर ते बाळासाहेबांना जिवंतपणी सोडून गेले नसते, असा प्रतिसवाल भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) केला आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी मुंबईत सभा घेतात आणि येथे येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे नावही घेत नाही, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांना जिवंतपणी सर्वांत जास्त त्रास कुणी दिला आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने बाळासाहेबांबद्दल आदराची भाषा बोलण्यात काहीच अर्थ नाही. देशासह महाराष्ट्रातही मोदींची लाट असल्यानं, त्यांच्यावर टीका करून स्वतःचं स्थान निर्माण करायची राज ठाकरे यांची धडपड असल्याचा टोलाही लगावला.’ “नरेंद्र मोदी यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर होता व आहे. अनेकदा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्या अंत्यदर्शनासाठीही ते उपस्थित राहिले होते. याउलट, बाळासाहेब ठाकरे यांना सर्वांत जास्त त्रास कुणी दिला, हे सुद्धा सर्वांना माहीत आहे.

राज ठाकरे यांच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एवढी चिंता होती, तर त्यांनी शिवसेना का सोडली? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. दरम्यान, गुजरातच्या विकासाचे कौतुक करणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक “यू टर्न’ घेतला आहे. लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे ते आता मोदींना लक्ष्य करू लागले आहेत.

Leave a Comment