चपराकी का बसत आहेत?

कॉंग्रेस पक्षाच्या दोन मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एकाच दिवशी चपराकीच्या दोन घटना घडल्या. एका घटनेत मुख्यमंत्र्यांनी एका कार्यकर्त्याला चपराक लगावली तर दुसर्‍या घटनेत कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवली. कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेचा, त्यांच्या जनसंपर्काचा आणि भवितव्याचा गंभीरपणे विचार करणारा कोणी असेल तर त्यांनी या चपराकीचा नीट विचार केला पाहिजे, अन्यथा अशा चपराकी पुन्हा पुन्हा बसत राहतील. उत्तराखंडात मुख्यमंत्री म्हणून हरिश रावत यांनी काल काम सुरू केले. परंतु त्यांची सुरुवात चपराकीने झाली. उत्तराखंडात हरिश रावत यांचा प्रभाव असतानाही त्यांना डावलून विजय बहुगुणा यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. आपली निवड कशी चुकीची आहे हे बहुगुणा यांनी वर्षभराच्या काळात पुरतेपणी सिद्ध करून दिले. राज्यात कॉंग्रेसच्या विजयाला हरिश रावत या बहुजन समाजातल्या नेत्याचा प्रभाव कारणीभूत ठरला असतानाही दरबारी राजकारणात पटाईत असलेल्या विजय बहुगुणा यांनी सत्ता प्राप्त केली होती. सोनिया गांधींच्या किचन कॅबिनेटमधील रिटा बहुगुणा-जोशी यांच्या प्रभावाचा परिणाम म्हणून त्यांचे बंधू विजय बहुगुणा यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

हे मुख्यमंत्री घराणेशाहीमुळे झालेले होते. विजय बहुगुणा यांचे पिताजी हेमवतीनंदन बहुगुणा हे कॉंग्रेसचे मोठे पुढारी होते. आणीबाणीनंतर ते जनता दलात आले आणि नंतर पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेले. त्यांचा कॉंग्रेसमधला प्रभाव त्यांच्या चिरंजीवांना सत्ता मिळविण्यास उपयोगी पडला, परंतु किचन कॅबिनेटमधला प्रभाव आणि प्रशासनाचे कौशल्य या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. कोणी तरी वशिल्याने मुख्यमंत्री झाला म्हणून तो प्रभावी मुख्यमंत्री ठरतोच असे नाही. किंबहुना बहुगुणा यांनी ते सिद्धच करून दिले. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला बहुगुणा हे मुख्यमंत्री परवडणार नाहीत हे लक्षात आले आणि त्यांनी आता नेतृत्व बदल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी महिलांना सत्ता देणार, तरुणांना सत्ता देणार असे घोकत आहेत. आता बहुगुणा यांना बदलताना त्यांनी महिला मुख्यमंत्री द्यायला पाहिजे होता. किमानपक्षी एखाद्या तरुणाला तरी हे पद बहाल करायला हवे होते. पण त्यांना खरोखर तसे करायचेच नाही. म्हणून त्यांनी हरिश रावत यांना नवा नेता केले.

या नेतृत्व बदलाला दुसरे कारण ठरले आहे ते बसपाच्या आमदारांचे. बसपाच्या आमदारांनी नेतृत्व बदल करावा असा आग्रह धरला. नेतृत्व बदलामुळे उत्तरांचलातल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आणि हरिश रावत यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्या जल्लोषामध्ये एक कार्यकर्ता भलत्याच उत्साहात हरिश रावत जिंदाबाद अशा घोषणा सातत्याने करायला लागला. त्यामुळे रावत वैतागले आणि त्यांनी त्या अति उत्साही कार्यकर्त्याच्या श्रीमुखात भडकावली. आजच्या काळामध्ये अशा छोट्या-मोठ्या घटना माध्यमांपासून लपून रहात नाहीत. त्यामुळे हीही लपून राहिली नाही. हरिश रावत यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ असा आपल्याच कार्यकर्त्याच्या श्रीमुखात भडकावून सुरू झाला ही गोष्ट प्रसिद्ध झाली. हरिश रावत यांना मात्र खुलासे करता करता नाकीनव आले. आपण वडिलकीच्या नात्याने आपल्या कार्यकर्त्याला चपराक लगावली असा खुलासा त्यांनी केला आहे. परंतु कोणत्याही चुकीच्या कृत्याच्या खुलाशाने ती चूक लपत नाही. दुसर्‍या बाजूला कॉंग्रेसला आणखी एक चपराक बसले आहे. हरियानामध्ये पानीपत या गावी हा प्रकार घडला.

पानीपत महोत्सव नावाचा एक कार्यक्रम तिथे सुरू होणार होता. त्यानिमित्ताने हरियानाचे कॉंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा तिथे गेले होते. लोकांच्या गर्दीतून वाट काढीत ते पुढे सरकत असताना अचानकपणे एका तरुणाने पुढे येऊन त्यांच्या श्रीमुखात भडकावली. राज्याच्या मुख्यमंत्र्याला एका सामान्य तरुणाने अशी चपराक मारावी ही गोष्ट त्या मुख्यमंत्र्याच्या कारभारावर प्रकाश टाकणारी आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांविषयी लोकांच्या मनात आदर राहिलेला नाही हीच गोष्ट त्यातून स्पष्ट होते. हरिश रावत यांच्या प्रसंगातून वेगळाच संकेत मिळतो. सामान्य माणसांविषयी नेत्यांना आस्था नाही आणि नेत्यांविषयी सामान्य माणसात आस्था नाही. कॉंग्रेस पक्ष जनतेपासून दूर गेला आहे. या वातावरणात राहुल गांधी यांच्यावर सुद्धा असा काही प्रसंग येऊ नये यासाठी पक्षाला फार प्रयत्न करावे लागतात. जाहीर सभेचे व्यासपीठ जनतेपासून दूर उभारावे लागते. एखाद्या मेळाव्यात राहुल गांधी सहभागी होणार असतील तर येणार्‍या लोकांना चपला बाहेर काढून आत जावे लागते. सत्तेवर असलेला पक्ष जनतेचे भले केल्याचा दावा करत आहे, पण या पक्षाला जनतेची भीती वाटत आहे.

Leave a Comment